नगर परिषदेचा शिलकी अर्थसंकल्प
By Admin | Updated: March 1, 2016 02:45 IST2016-03-01T02:45:14+5:302016-03-01T02:45:14+5:30
कोणतीही करवाढ नसलेल्या महाड नगर परिषदेच्या २०१६-१७च्या २ लाख ६० हजार रुपये शिलकी अर्थसंकल्पाला सोमवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात आली.

नगर परिषदेचा शिलकी अर्थसंकल्प
महाड : कोणतीही करवाढ नसलेल्या महाड नगर परिषदेच्या २०१६-१७च्या २ लाख ६० हजार रुपये शिलकी अर्थसंकल्पाला सोमवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात आली. नगराध्यक्ष सुनील कविस्कर यांनी हा अर्थसंकल्प सादर केला.
या अर्थसंकल्पामध्ये प्रारंभी शिल्लक ६ कोटी ३८ लाख ५० हजार ३४६ रुपये व २०१६-१७ मधील अंदाजित जमा १६ कोटी २० लाख ९० हजार ५०० रुपये असा खर्च वजा जाता २ लाख ६० हजार २४६ रुपये शिल्लक राहणार आहेत. नगर परिषदेच्या या अर्थसंकल्पात सामान्य प्रशासन, सार्वजनिक सुरक्षा, रस्त्यावरील दिवाबत्ती, आरोग्य खाते, उद्याने, शिक्षण, सार्वजनिक सोईसुविधा या बाबींवर तरतूद करण्यात आलेली आहे. एलईडी पथदिव्यांसाठी ३० लाख रुपयांची तरतूद या अर्थसंकल्पात आहे. त्याचबरोबर समाजातील दुर्बल घटक, अपंग कल्याणासाठी तर सामाजिक व सेवाभावी संस्थेसाठी प्रोत्साहनपर अनुदान देण्याची तरतूद या करण्यात आलेली आहे. शहर विकास, बागा व उद्याने विकास यावरही पालिकेने भर दिला आहे.
या सभेत महाड औद्योगिक वसाहतींकडून नगर परिषदेला केल्या जाणाऱ्या पाणीपुरवठा बिलापोटी दिवसेंदिवस थकबाकी वाढतच असून ती आता ९ कोटी रुपये झाल्याची बाब शिवसेनेचे नगरसेवक बिपीन म्हामुणकर आणि नितीन आते यांनी लक्षात आणून दिली. या देणे असलेल्या थकबाकीसाठी नगर परिषदेने अर्थसंकल्पामध्ये कुठलीही तरतूद केली नसल्याचे निदर्शनास आणून दिले. (वार्ताहर)
> अलिबागकरांना कोणतीही करवाढ नाही
१अलिबाग : अलिबाग नगरपरिषदेचा २०१५-२०१६ चा सुधारित व आगामी २०१६-२०१७ वर्षाचे अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक यांचा समावेश असलेल्या ४४ कोटी ७५ लाख ७८ हजार ९७० रुपयांच्या अलिबाग नगरपरिषदेच्या अर्थसंकल्पास सोमवारी नगरपरिषदेच्या सभागृहात सर्वसाधारण सभेत मांडून त्यास मंजुरी देण्यात आली आहे. नगराध्यक्ष प्रशांत मधुुसूदन नाईक यांच्या अध्यक्षखाली सभा झाली. २अर्थसंकल्पात अलिबागच्या नागरिकांवर कोणत्याही स्वरूपातील कर वा आर्थिक बोजा टाकला नाही. अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकात महसुली उत्पन्नापासून १६ कोटी ८२ लाख, भांडवली अनुदानातून १२ कोटी २४ लाख व इतर उत्पन्नातून ४ कोटी ३ लाख रुपये अपेक्षित आहेत. नगरपरिषदेस शासनाकडून वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत २ कोटी रुपये मिळणार आहेत. यामधून श्रीबाग नं. २ क्रीडा संकुलाचे काम करण्यात येणार आहे. ३जिल्हा न्यायालयाच्या समोर व जिल्हा रुग्णालयाच्या समोरील मोकळ्या जागेचा विकास करून पे अॅन्ड पार्क सुरू करण्यात येणार आहे. यापासून नगरपरिषदेच्या उत्पन्नात भर पडणार आहे. पी.एन.पी. नगर येथे नवीन भाजी मार्केटचे बांधकाम करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या विशेष सभेस उपनगराध्यक्षा सुरक्षा शाहर् आदींसह अधिकारीउपस्थित होते.