थरांची उंची घटली
By Admin | Updated: September 7, 2015 04:12 IST2015-09-07T04:12:35+5:302015-09-07T04:12:35+5:30
न्यायालयाच्या निर्देशानंतर पनवेलमधील काही दहीहंड्या रद्द झाल्या तर काही मंडळांनी मैदानात दहीहंड्यांची उंची कमी करून केवळ औपचारिकता पार पाडली

थरांची उंची घटली
कळंबोली : न्यायालयाच्या निर्देशानंतर पनवेलमधील काही दहीहंड्या रद्द झाल्या तर काही मंडळांनी मैदानात दहीहंड्यांची उंची कमी करून केवळ औपचारिकता पार पाडली.
कळंबोलीत जगदीश गायकवाड मित्र मंडळाने यंदा चर्चच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत दहीहंडी बांधली होती. त्याचबरोबर पेट्रोलपंपालगतच्या भूखंडावर हा उत्सव भरवला होता. त्यामुळे कळंबोलीतील मुख्य रस्ता यंदा मोकळा होता. परंपरा अबाधित ठेवण्यासाठी बिमा संकुलात कमी उंचीची हंडी उभारण्यात आली होती. खांदा वसाहतीतील दोन मोठ्या दहीहंड्या रद्द करण्यात आल्याने गोविंदा पथकांमध्ये निरुत्साह होता. नवीन पनवेलमध्ये सेक्टर ६ समोरील राखीव असलेल्या मैदानात नगरसेवक संतोष शेट्टी यांनी दहीहंडी उभारली.
दिवसभर ढोल-ताशांच्या गजरात गोविंदा मानाच्या दहीहंड्यांना भेटी देवून सलामी देत होते. नेरूळमध्ये महापालिकेचे विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांनी १५ लाख रूपयांची बक्षिसे ठेवली होती. मानाच्या हंडीला अडीच लाख रूपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते.
कोपरखैरणे वनवैभव क्रीडा मंडळाच्या दहीहंडीलाही मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती. वाशीमध्ये माजी उपमहापौर भरत नखाते, नेरूळमध्ये सूरज पाटील व अनेक राजकीय पदाधिकाऱ्यांनी उत्सवाचे आयोजन केले होते. करमणुकीसाठी सांस्कृृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते.