उरणमधील ‘त्या’ तीन बेपत्ता मुलींचा शोध

By Admin | Updated: August 8, 2016 02:25 IST2016-08-08T02:25:06+5:302016-08-08T02:25:06+5:30

शहरातून ४० दिवसांपासून बेपत्ता असलेल्या तीन मुलींचा शोध लागल्याने पोलिसांची सुटकेचा नि:श्वास टाकला आहे. या मुली उत्तर प्रदेशातील नई बस्ती झाशी शहर

Three of those 'missing' girls in Uran | उरणमधील ‘त्या’ तीन बेपत्ता मुलींचा शोध

उरणमधील ‘त्या’ तीन बेपत्ता मुलींचा शोध


उरण : शहरातून ४० दिवसांपासून बेपत्ता असलेल्या तीन मुलींचा शोध लागल्याने पोलिसांची सुटकेचा नि:श्वास टाकला आहे. या मुली उत्तर प्रदेशातील नई बस्ती झाशी शहर पोलीस ठाण्यात भाड्याच्या घरासाठी पोलीस व्हेरिफिकेशन मिळविण्याच्या प्रयत्नात होत्या.
उरण तालुक्यातील नागाव म्हातवली येथील आकांक्षा भरणे (१७) आणि अनुष्का भरणे (१५) या दोघी सख्ख्या बहिणी आणि मैत्रीण सोनल पिंगळे (२१) या तीन मुली २४ जून रोजी घराबाहेर पडल्या होत्या. मात्र महाविद्यालयात प्रवेशासाठी सकाळी ११ वा. घराबाहेर पडलेल्या तिघीही मुली उशिरापर्यंत घरी परतल्याच नसल्याने पालकांनी मुली हरविल्याची तक्रार उरण पोलीस ठाण्यात दाखल केली होती. एकाच दिवशी तीन मुली बेपत्ता झाल्याने उरणमध्ये खळबळ माजली होती. पोलिसांनीही तपासासाठी नवी मुंबई आयुक्त हेमंत नगराळे, उपायुक्त विश्वास पांढरे, सहाय्यक पोलीस आयुक्त बाबाजी बुधवंत, उरण वपोनि राजेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली शोध कार्यासाठी सहा पथके तयार केली होती. मात्र बेपत्ता मुलींचा मागमूसही लागत नव्हता. मुलींचा शोध युद्धपातळीवर घेण्याचे काम सुरू होते. तरीही तपासाला दिशा मिळेल असा कोणताही धागा हाती आला नव्हता. मुलींचे मोबाइलही बंद असल्याने तपासकामाला गती मिळत नव्हती. त्यामुळे या तीनही मुली उरणमधून ठरवून बेपत्ता झाल्याच्या कयासापर्यंत उरण पोलीस याआधीच पोहोचले होते. मात्र तपास लागत नसल्याने पोलिसांवर टीकेची झोड उठविण्यात येत होती. त्यानंतरही पोलिसांचे शोधकार्य सुरूच होते. दोन दिवसापूर्वी उत्तर प्रदेशातील नई बस्ती झाशी शहर पोलीस ठाण्यातून उरणच्या बेपत्ता तीन मुली सापडल्याचा फोन आला आणि उरण पोलिसांनी झाशी गाठली. तेथील पोलिसांच्या मदतीने बेपत्ता मुलींना उरणमध्ये सुखरुपपणे आणण्यात आल्याची माहिती उरण पोलीस ठाण्याचे वपोनि राजेंद्र आव्हाड यांनी दिली.
पोलीस तपासात तीनही मुली रेल्वेने उत्तर प्रदेशात दाखल झाल्या होत्या. सावत्र आईच्या जाचाला कंटाळून घराबाहेर पडल्या होत्या, त्या घरी न परतण्याच्या निश्चयानेच. त्यामुळे आजतागायत त्यांचा मोबाइलही सुरू केला नव्हता. परगावात पोटापाण्यासाठी रोजगारासाठी शोध सुरू होता. जवळ असलेल्या पैशातून त्यांनी झाशी शहर पोलीस ठाण्यात हद्दीत खोलीही भाड्याने घेतली होती. मात्र भाडेकरुंची पोलिसांना माहिती देण्यासाठी पोलीस व्हेरिफिकेशनसाठी प्रयत्न सुरू होते. या प्रयत्नातूनच तिन्ही बेपत्ता मुलींचा नई बस्ती झाशी शहर पोलिसांना सुगावा लागला. मुली घरी जाण्यास तयार नसल्याने त्यांना सुधारगृहात पाठविण्यात आले आहे.

Web Title: Three of those 'missing' girls in Uran

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.