A three-member committee for questions of project victims in ten villages; CIDCO's decision | दहा गावांतील प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांसाठी त्रिसदस्यीय समिती; सिडकोचा निर्णय
दहा गावांतील प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांसाठी त्रिसदस्यीय समिती; सिडकोचा निर्णय

नवी मुंबई : आंतरराष्ट्रीय विमानतळ बाधित दहा गावातील विशेषत: उलवे, कोंबडभूजे, तरघर आणि अन्य गावातील बांधकामांना तसेच कुलदैवत मंदिर, खायगी मंदिर यांचे चलचित्रण करण्यात आलेल्या बांधकामाच्या तक्रारींचा निपटारा करण्यासाठी, तसेच त्यांच्या प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी सिडकोने त्रिसदस्यीय समितीची स्थापना केली आहे. सेवानिवृत्त सनदी अधिकारी सुबोधकुमार हे या समितीचे अध्यक्ष असणार आहेत.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम प्रगतिपथावर आहे; परंतु गावांच्या स्थलांतराचा प्रश्न काही प्रमाणात शिल्लक आहे. विशेष म्हणजे, आतापर्यंत दहा गावांतील जवळपास ९० टक्के ग्रामस्थांनी स्थलांतर केले आहे. उर्वरित ग्रामस्थांनी विविध मागण्यांचा रेटा लावत स्थलांतराला विरोध दर्शविला आहे. त्यामुळे सिडकोसमोर पेच निर्माण झाला आहे.

या पार्श्वभूमीवर उलवे, कोंबडभुजे, तरघर आणि इतर गावांतील प्रकल्पग्रस्तांचे प्रलंबित प्रश्न निकाली काढण्यासाठी सिडकोने या त्रिसदस्यीय समितीची स्थापना केली आहे. सनदी अधिकारी सुबोधकुमार यांच्या अध्यक्षतेखालील या समितीत सिडकोचे अतिरिक्त मुख्य भूमी व भूमापन अधिकारी (नमुंआवि) व अतिक्रमण विभागाचा प्रमुख हे सदस्य असणार आहेत. तसेच समितीत स्थानिक प्रकल्पग्रस्त समितीच्या प्रतिनिधींचा व संबंधित गावचे प्रतिनिधी यांचा आवश्यकतेप्रमाणे समावेश केला जाईल, असे सिडकोकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Web Title: A three-member committee for questions of project victims in ten villages; CIDCO's decision

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.