पोयनाड दरोड्यातील तीन आरोपींना अटक
By Admin | Updated: September 26, 2015 23:16 IST2015-09-26T23:13:15+5:302015-09-26T23:16:13+5:30
पोयनाड येथील सुरभी ज्वेलर्सवर टाकलेल्या दरोड्यातील तीन आरोपींना रायगड पोलिसांनी भिवंडी येथून अटक केली आहे. त्यांच्याकडून अर्धा किलो सोनेही हस्तगत करण्यात आले आहे.

पोयनाड दरोड्यातील तीन आरोपींना अटक
अलिबाग : पोयनाड येथील सुरभी ज्वेलर्सवर टाकलेल्या दरोड्यातील तीन आरोपींना रायगड पोलिसांनी भिवंडी येथून अटक केली आहे. त्यांच्याकडून अर्धा किलो सोनेही हस्तगत करण्यात आले आहे. अन्य चार आरोपींना लवकरच जेरबंद करण्यात येईल, असा विश्वास रायगड पोलिसांनी व्यक्त केला आहे. याबाबतची पत्रकार परिषद रविवारी दुपारी जिल्हा पोलिस अधिक्षक सुवेझ हक घेणार आहेत.
२६ आॅगस्ट २०१५ रोजी अलिबाग तालुक्यातील पोयनाड येथील बाजारपेठेतील सुरभी ज्वेलर्सवर दरोडा टाकण्यात आला होता. यावेळी टोळील एकाला दुकानाचे मालक भारत जैन यांनी पकडले होते. दरोड्यामध्ये सुमारे साडे तीन किलो सोन्याचे दागिने आणि सुमारे दहा लाख रुपयांची रोकड असे एकूण एक करोड चार लाख लुटण्यात आले होते. या गुन्ह्यातील अन्य दोन आरोपींना आधीच अटक केली आहे. त्यापैकी एक पोयनाड येथीलच असून दुसरा आरोपी भिवंडीचा आहे.
पोलिसांना तपासात त्यांच्याकडून कोणतीही सखोल माहिती मिळत नव्हती. हा तपास रायगडच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपविण्यात आला होता. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने सायबर सेलच्या मदतीने तीन आरोपींचा छडा लावण्यात यश मिळवले. पकडण्यात आलेल्या तीनही आरोपींना भिवंडीतून अटक केल्याचेही सुत्रांनी स्पष्ट केले.
याप्रकरणातील आणखी चार आरोपींचा शोध पोलीस घेत असून लवकरच त्यांच्या मुसक्या आवळण्यात येतील, अशी माहिती पोलिस सुत्रांनी दिली. (वार्ताहर)