सोनसाखळी चोरणाऱ्या टोळीस अटक
By Admin | Updated: October 31, 2015 00:17 IST2015-10-31T00:17:05+5:302015-10-31T00:17:05+5:30
घरफोडी व सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यात सक्रिय असलेल्या दोन टोळ्यांना कोपरखैरणे पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून एकूण १० लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

सोनसाखळी चोरणाऱ्या टोळीस अटक
नवी मुंबई : घरफोडी व सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यात सक्रिय असलेल्या दोन टोळ्यांना कोपरखैरणे पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून एकूण १० लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
परिसरातली वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी वरिष्ठ निरीक्षक सतीश गायकवाड यांनी मोर्चेबांधणी केली होती. यानुसार खबऱ्यांद्वारे मिळणाऱ्या माहितीच्या आधारे पोलिसांकडून ठिकठिकाणी नाकाबंदी करून काही ठिकाणी धाडसत्रही सुरू केले होते. त्यामध्ये घरफोडी व सोनसाखळी चोरी करणाऱ्या सहा जणांना अटक केली आहे. त्यापैकी दोघांची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली आहे. दोघेही सोनार असून, चोरीचे दागिने ते खरेदी करायचे. तुफान राजपुरोहित (यश ज्वेलर्स) व संजय पिचड (राकेश ज्वेलर्स) अशी त्यांची नावे आहेत. त्यांनी सुमारे ३९ तोळे सोन्याचे चोरीचे दागिने गाळून त्यापासून लगडी बनवल्या होत्या.
परिसरात घरफोडी करणारे रोहित दौंडकर (२१) व अजय मोरे (२३) हे चोरीचे दागिने त्यांना विकायचे. यानुसार त्यांनाही अटक करण्यात आली आहे. रोहित घणसोली गावचा राहणारा असून, अजय हा कोपरखैरणे गावचा राहणार आहे. निरीक्षक विजय तायडे, साहाय्यक निरीक्षक विक्रम बनसोडे, उपनिरीक्षक योगेश देशमुख, हवलदार संजय पाटील, विनोद पाटील, अजय नंदुरकर आदींच्या पथकाने ही कारवाई केली आहे.
या पथकाने कोपरखैरणे सेक्टर १९ येथील खाडीलगत परिसरातून दोघांना अटक केली. चौकशीत त्यांनी सहा घरफोडीच्या गुन्ह्यांची कबुली दिली. यानुसार त्यांच्याकडून पाच लाख ७५ हजार रुपये किमतीचे चोरीचे २३ तोळे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत.
शिवा परिसरात गस्तीदरम्यान दोघा सोनसाखळी चोरांना अटक करण्यातदेखील त्यांना यश आले आहे. श्याम बच्छेर (२३) व शवाज खान (२०) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. श्याम हा कोपरखैरणे गावचा राहणारा असून, एका इव्हेंट कंपनीत कामाला आहे. तर खान हा घणसोली सेक्टर ३ चा राहणार असून, सॉफ्टवेअर इंजिनीअरिंगचा विद्यार्थी आहे. त्यांनी सहा गुन्ह्यांची कबुली दिली असून, त्यांच्याकडून चोरीचे चार लाख रुपये किमतीचे १६ तोळे सोन्याचे दागिने पोलिसांनी जप्त केले आहेत. खान याने नुकतीच एक जुनी मोटारसायकल खरेदी केली होती. यावरून तो बच्छेरच्या मदतीने परिसरात सोनसाखळी चोरी करीत होता. सहज करता येणारा गुन्हा असल्याने तो सोनसाखळी चोरी करू लागला होता. तर चोरीचे दागिने सोनारांना विकून आलेल्या पैशातून दोघेही अय्याशी करायचे. (प्रतिनिधी)