घारापुरी बेटावर हजारो शिवभक्तांची गर्दी
By Admin | Updated: March 7, 2016 02:44 IST2016-03-07T02:44:19+5:302016-03-07T02:44:19+5:30
मुंबईपासून ११ किमी अंतरावर असलेल्या जागतिक कीर्तीच्या घारापुरी लेण्या नेहमीच जगभरातील पर्यटकांना भुरळ घालत आल्या आहेत. काळ्या पाषाणात सहाव्या शतकातील

घारापुरी बेटावर हजारो शिवभक्तांची गर्दी
मधुकर ठाकूर, उरण
मुंबईपासून ११ किमी अंतरावर असलेल्या जागतिक कीर्तीच्या घारापुरी लेण्या नेहमीच जगभरातील पर्यटकांना भुरळ घालत आल्या आहेत. काळ्या पाषाणात सहाव्या शतकातील अतिप्राचीन कोरलेल्या अप्रतिम लेण्यांमुळे घारापुरी लेण्यांना वर्ल्ड हेरिटेजचा वारसा लाभला आहे. महाशिवरात्रीला याठिकाणी मोठी जत्रा भरते. हजारो शिवभक्त याठिकाणी दर्शनासाठी येतात.
महाराष्ट्रात वेरुळ, अंबेजोगाई, जोगेश्वरी आदी ठिकाणी शैव लेण्या आहेत. मात्र इतर ठिकाणच्या असलेल्या शैव लेण्यांपेक्षा घारापुरीच्या लेण्या आगळ्यावेगळ्या एकमेवाद्वितीय अशाच आहेत. गाभाऱ्याच्या मंडपात प्रचंड आकारातील शिवलिंग आहे. या गाभाऱ्याला चारही दिशेने प्रवेशद्वारे आहेत. लेण्यातील गाभाऱ्यात एकाचवेळी सकल आणि निष्कल अशा दोन्ही प्रकारातील शिवाचे अस्तित्व असलेल्या लेण्या फक्त घारापुरीतच आढळतात.
उत्तरेकडे प्रवेश करताच प्रदक्षिणा मार्गाने जाताना पहिल्यांदाच आढळते ती योगेश्वर शिवाची (लवलीश) मूर्ती. या शिल्प पटातील लहान - मोठ्या प्रतिमांच्या केंद्रस्थानी शिवशंकर पद्मासनात बसलेले आहेत. मस्तकाच्या मागे प्रभावलय आहे. आजूबाजूला हंसारूढ ब्रम्हा, गरुडारूढ विष्णू, अश्वारूढ सूर्य, गजारूढ इंद्र, अ मृतकुंभधारी चंद्र आहेत. त्याच्या बाजूलाच रावणानुग्रहमूर्तीचे (कैलासोतोलन) शिल्प आहे.
तिसऱ्या शिल्पात शिवपार्वती सारिपाट खेळतानाचा प्रसंग साकारण्यात आला आहे. मंडपाच्या दक्षिणेकडील भिंतीत तीन शिल्पे कोरलेली आहेत. त्यापैकी पहिल्यात अर्धनारीश्वर शिवाची सव्वा पाच मीटर उंचीची अतिभव्य अशी मूर्ती कोरलेली आहे. अर्धनारीश्वर म्हणजे अर्धा भाग पुरुषाचा व अर्धा भाग प्रकृतीचा अशी मूर्ती होय. या शिल्पात उजवे अंग शिवाचे तर डावे अंग पार्वतीचे आहे. सृष्टीच्या निर्मितीला पुरुष आणि प्रकृती कारणीभूत असते. म्हणजेच शिवशक्त्यैक्य कारणीभूत असते असेच या प्रचंड शिल्पातून संदेश देण्यात आला आहे.