Thousands of quintals of grain stored at Kalambhe Center in Wadya | वाड्यातील कळंभे केंद्रावर हजारो क्विंटल धान्याचा साठा

वाड्यातील कळंभे केंद्रावर हजारो क्विंटल धान्याचा साठा

वसंत भोईर
लोकमत न्यूज नेटवर्क 
वाडा : आदिवासी विकास महामंडळामार्फत तालुक्यात अनेक ठिकाणी धान्य खरेदी केंद्रे असून येथे आधारभूत किमतीत भात, नागली, वरईची खरेदी केली जाते. कळंभे केंद्रावर महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक व उपप्रादेशिक व्यवस्थापक यांनी अलीकडेच भेट 
दिली असता त्यांना खरेदीपेक्षा 
हजारो क्विंटल धान्याचा जास्त साठा आढळून आला असल्याने येथे खळबळ उडाली आहे. दरम्यान, संबंधित केंद्रचालकांना अनियमिततेबाबत व्यवस्थापकांनी खुलासा सादर करण्याची नोटीस बजावली आहे. या नोटिसीमुळे केंद्रचालकांचे धाबे दणाणले आहे.

आदिवासी विकास महामंडळामार्फत आदिवासी सेवा सहकारी सोसायट्यांच्या धान्य खरेदी केंद्रात भात, नागली, वरईची खरेदी केली जाते. तालुक्यात पोशेरी, खानिवली, परळी, कळंभे, गारगाव व खैरे-आंबिवली अशा सहा ठिकाणी खरेदी केंद्रे आहेत.
 आदिवासी विकास मंडळ जव्हार कार्यालयाचे प्रादेशिक व्यवस्थापक व उपप्रादेशिक व्यवस्थापक आर. बी. पवार यांनी ७ जानेवारीला कळंभे केंद्राला भेट दिली असता त्यांना धान्याचा जास्त साठा असल्याचे निदर्शनास आले. ६ जानेवारीच्या खरेदी अहवालात ३ हजार ५७२ क्विंटल धान खरेदी झाल्याचे दाखविले; परंतु प्रत्यक्षात १० ते १२ हजार क्विंटल जास्त धान्यसाठा असल्याचे व्यवस्थापकांच्या निदर्शनास आले.
दरम्यान, खरेदी केंद्राला तत्काळ नोटीस बजावून एका दिवसात खुलासा देण्याचे आदेश केंद्रचालकांना देण्यात आले आहेत. मुदतीत खुलासा न दिल्यास संस्थेवर फौजदारी गुन्हा दाखल का करण्यात येऊ नये, अशीही विचारणा नोटिसीमध्ये करण्यात आली आहे. या संदर्भात कळंभे केंद्राचे सचिव नरेश देशमुख यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला असता त्यांचा दूरध्वनी बंद आहे.

धान्याचा साठा जास्त आढळल्याने कळंभे केंद्राच्या संस्थाचालकांना नोटीस बजावली आहे. दोन दिवस सुटी असल्याने त्यांचा खुलासा आलेला नाही. उद्या खुलासा आल्यानंतर पुढील कार्यवाही करू.
- आर. बी. पवार, उपप्रादेशिक व्यवस्थापक आदिवासी विकास महामंडळ, 
मोखाडा विभाग

 

Web Title: Thousands of quintals of grain stored at Kalambhe Center in Wadya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.