तहानलेल्या चाणजे ग्रामपंचायत हद्दीतील हजारो ग्रामस्थ अन् महिलांचा पाणी टंचाई विरोधात तहसीलवर हंडा मोर्चा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2023 05:41 PM2023-03-01T17:41:29+5:302023-03-01T17:41:53+5:30

मोर्च्यानंतर शिष्टमंडळाशी केलेल्या चर्चेनंतर विविध समस्या दूर करुन पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी तत्परतेने उपाययोजना करण्याचे ठोस आश्वासन उरण तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी दिले आहे.

Thousands of villagers and women of the thirsty Chanje Gram Panchayat area protest against water shortage in the tehsil. | तहानलेल्या चाणजे ग्रामपंचायत हद्दीतील हजारो ग्रामस्थ अन् महिलांचा पाणी टंचाई विरोधात तहसीलवर हंडा मोर्चा 

तहानलेल्या चाणजे ग्रामपंचायत हद्दीतील हजारो ग्रामस्थ अन् महिलांचा पाणी टंचाई विरोधात तहसीलवर हंडा मोर्चा 

googlenewsNext

- मधुकर ठाकूर

उरण : राज्य, झेडपी, पंचायत समिती आणि चाणजे ग्रामपंचायतींच्या भोंगळ कारभारावर आसुड ओढत आणि जोरदार घोषणाबाजी करत बुधवारी (१) चाणजे ग्रामपंचायतींच्या हद्दीतील नागरिकांनी पिण्याच्या पाण्यासाठी उरण तहसील कार्यालयावरच अभुतपुर्व हंडामोर्चा काढला होता.या मोर्चात हजारो ग्रामस्थ व महिला सहभागी झाल्या होत्या.

मोर्च्यानंतर शिष्टमंडळाशी केलेल्या चर्चेनंतर विविध समस्या दूर करुन पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी तत्परतेने उपाययोजना करण्याचे ठोस आश्वासन उरण तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी दिले आहे. त्यानंतरच संतप्त झालेले मोर्चेकरी माघारी परतले आहेत.
 चाणजे ग्रामपंचायत उरण तालुक्यातील सर्वात मोठी आणि सधन ग्रामपंचायत म्हणून ओळखली जाते. सुमारे ३५ हजार लोकसंख्या असलेल्या चाणजे ग्रामपंचायतींच्या हद्दीतील सातही पाड्यांना मागील अनेक वर्षांपासून पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.पाणी टंचाई दूर करण्यासाठी मागील काही वर्षांपासून कोट्यावधी रुपये खर्च करून विविध योजना राबविण्यात आल्या आहेत.मात्र या विविध योजनांच्या पुर्ततेनंतरही हजारो ग्रामस्थांच्या नळांना पाण्याऐवजी फक्त हवाच येत आहे.

काही ठिकाणी फक्त २० दिवसातून एकदाच पाणी मिळत आहे.तेही गरजे इतकेही मिळत नसल्याने ऐन उन्हाळ्यातच पाणी टंचाई भीषण झाली आहे.चाणजे ग्रामपंचायतीला १० लाख लिटर पाणी कोटा मंजूर आहे.तरीही एमआयडीसीकडून दररोज ११ लाख लीटर असा ज्यादा पाणी पुरवठा केला जात असल्याचे  एमआयडीसीकडून सांगितले जात आहे. त्या व्यतिरिक्त सिडकोकडून हेटवणे धरणातुनही काही पाड्यांना पाणी पुरवठा केला जात आहे.वापरासाठी बोअरवेल खोदल्या आहेत.इतके पाणी पुरवठा करण्याचे स्त्रोत असताना पाणी जाते कुठे यासाठी ग्रामस्थांनीच शोध घेण्यासाठी पुढाकार घेऊन पाणी टंचाईची कारणे ग्रामस्थांनी शोधून काढली आहेत.या शोध मोहीमेत मागील अनेक वर्षांपासून चाणजे ग्रामपंचायतीच्या आजी-माजी सत्ताधाऱ्यांनीच हद्दीतील सुमारे ६०० इमारतींना अवैध नळ कनेक्शन दिली आहेत.

धनदांडगे थेट मुख्य जलवाहिन्यांनाच विद्युत पंप लाऊन राजरोसपणे मोठ्या प्रमाणावर पाण्याची चोरी करीत आहेत.पाणी पुरवठ्याच्या नियोजनातही ग्रामपंचायत सपशेल अपयशी ठरली आहे.ग्रामपंचायत बिल्डर, धनदांडगे यांच्यातील थेट साटेलोट्यांमुळेच सामान नागरिकांपर्यंत पाणी पोहचत नसल्याचे दिसून आल्यानंतर संतप्त झालेल्या करंजा सातपाड्यांनी ग्रामस्थांनी मागील आठ दिवस जनजागृती करीत पिण्याच्या पाण्यासाठी उरण तहसील कार्यालयावरच मोर्चा काढण्याचा निर्धार पक्का केला होता. त्यानुसार राज्य, झेडपी, पंचायत समिती आणि चाणजे ग्रामपंचायतींच्या भोंगळ कारभारावर आसुड ओढत आणि जोरदार घोषणाबाजी करत बुधवारी (१) चाणजे ग्रामपंचायतींच्या हद्दीतील नागरिकांनी पिण्याच्या पाण्यासाठी उरण तहसील कार्यालयावरच अभुतपुर्व हंडामोर्चा काढला होता.उरण चारफाटा येथुन उरण तहसील कार्यालयावर काढण्यात आलेल्या मोर्चात कामगार नेते भूषण पाटील, सातपाड्यांतील गाव अध्यक्ष मनोहर कोळी, संतोष पवार, सिताराम नाखवा आणि हजारोंच्या संख्येने ग्रामस्थ व महिला सहभागी झाल्या होत्या.

महिलांनी तर हंडे वाजवून शासकीय यंत्रणेचा धिक्कार केला.तहसिल कार्यालयावर मोर्चा धडकल्यानंतर अनेक वक्त्यांनी पाणी टंचाईसाठी जबाबदार असलेल्या शासकीय, प्रशासकीय, राज्यकर्त्यांचा शाब्दिक कोट्या करून चांगलाच समाचार घेतला. त्यानंतर मोर्चेकऱ्यांच्या शिष्टमंडळाने उरण तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांची भेट घेऊन विस्तृत चर्चा केली.याप्रसंगी उरण एमआयडीसीचे उप अभियंता रविंद्र चौधरी,उरण गटविकास अधिकारी सी.एस.राजपुत, सिडको अधिकारी ॠषी नाईक व शिष्टमंडळातील प्रतिनिधी उपस्थित होते. या चर्चेत शिष्टमंडळाने चाणजे ग्रामपंचायतींचा भोंगळ कारभार उघडकीस आणला.त्यानंतर इमारती, बिल्डर, धनदांडगे व इतरांना दिलेल्या अवैध, अनधिकृत दिलेल्या नळ जोडण्या तोडण्याचे तसेच बेकायदेशीर सुरू असलेली पाणी चोरी रोखण्यासाठी विद्युत पंप जप्त करण्याची कारवाई करण्याच्या सूचना तहसीलदारांनी चाणजे ग्रामपंचायतींला दिल्या आहेत.

चाणजे ग्रामपंचायत हद्दीतील गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. तर जल जीवन मिशन योजने अंतर्गत १० कोटी खर्चाच्या योजनेचे काम सुरू करण्यात आले असल्याची माहिती उरण गटविकास अधिकारी सी.एस.राजपुत यांनी दिली.सिडको अधिकाऱ्यांनीही हेटवणे धरणातुन करण्यात येणाऱ्या पाणीपुरवठ्यात आणखी वाढ करण्याचे आश्वासन दिले आहे.शासकिय अधिकाऱ्यांनी दिलेल्या ठोस आश्वासनानंतरच मोर्चेकऱ्यांनी तुर्तास माघार घेतली असल्याचे भूषण पाटील, मनोहर कोळी यांनी सांगितले.

Web Title: Thousands of villagers and women of the thirsty Chanje Gram Panchayat area protest against water shortage in the tehsil.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.