नवी मुंबई विमानतळावर तिसरीही धावपट्टी! दीर्घकालीन हवाई वाहतुकीचा आढावा; सल्लागार नियुक्तीची प्रक्रिया सुरू
By कमलाकर कांबळे | Updated: December 15, 2025 05:51 IST2025-12-15T05:51:21+5:302025-12-15T05:51:39+5:30
नवी मुंबई विमानतळावर चौथे टर्मिनल उभारण्याचा प्रस्ताव पुढे आला असून, त्याअनुषंगाने आणखी एक रनवे बांधण्याच्या शक्यतेचा अभ्यास केला जात आहे.

नवी मुंबई विमानतळावर तिसरीही धावपट्टी! दीर्घकालीन हवाई वाहतुकीचा आढावा; सल्लागार नियुक्तीची प्रक्रिया सुरू
कमलाकर कांबळे
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : देशातील हवाई वाहतुकीचा वाढता वेग आणि मुंबईवरील ताण लक्षात घेता नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हा केवळ पर्यायी प्रकल्प न राहता भविष्यातील प्रमुख हवाई केंद्र म्हणून पुढे येत आहे. या पार्श्वभूमीवर नवी मुंबई विमानतळावर चौथे टर्मिनल उभारण्याचा प्रस्ताव पुढे आला असून, त्याअनुषंगाने आणखी एक रनवे बांधण्याच्या शक्यतेचा अभ्यास केला जात आहे. त्यासाठी सिडकोने सल्लागार नियुक्तीची प्रक्रिया सुरू केली आहे.
दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ हा सध्या भारताचा एकमेव तीन रनवे असलेला विमानतळ आहे. येथे दरवर्षी सात कोटींहून अधिक प्रवासी ये-जा करतात. तीन रनवेच्या जोरावर दिल्ली विमानतळ देशातील सर्वाधिक उड्डाणे हाताळतो. मात्र, प्रचंड वर्दळ, धुक्याचा परिणाम, हवामानातील अडथळे आणि शहराच्या मध्यभागी असलेली जागेची मर्यादा यामुळे या विमानतळाला विस्ताराची गरज असूनही पर्यावरणीय आणि भौगोलिक अडचणीमुळे ते शक्य होताना दिसत नाही.
दिल्लीपाठोपाठ देशातील दुसरे तीन रनवेचे विमानतळ
याउलट, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हा ग्रीनफिल्ड आणि नियोजित विस्ताराचा प्रकल्प आहे. सध्याच्या अधिकृत आराखड्यानुसार अंतिम टप्यात येथे दोन समांतर रनवे आणि तीन टर्मिनल असणार आहेत. सध्या एक रनवे आणि एक टर्मिनल इमारत तयार असून, २५ डिसेंबरपासून प्रत्यक्ष विमान वाहतूक सेवा सुरू होणार आहे.
मात्र, मुंबई विमानतळावरील वाढता ताण, भविष्यातील प्रवासीसंख्या आणि आंतरराष्ट्रीय कनेक्टिव्हिटीचा विचार करता चौथे टर्मिनल प्रस्तावित केले आहे. या अतिरिक्त टर्मिनलमुळे वाढणाऱ्या उड्डाणांसाठी धावपट्टी अपुरी पडू नये, यासाठी तिसऱ्या रनवेच्या शक्यतेचा अभ्यास सुरू झाला आहे. हा प्रस्ताव प्रत्यक्षात आल्यास, नवी मुंबई विमानतळ हे दिल्लीपाठोपाठ देशातील दुसरे तीन रनवेचे विमानतळ ठरेल, असा विश्वास सिडकोने व्यक्त केला आहे.
प. भारताचे आंतरराष्ट्रीय केंद्र
दिल्ली विमानतळाचा अनुभव नवी मुंबईसाठी मार्गदर्शक ठरू शकतो. नैना क्षेत्र, मेट्रो, सागरी मार्ग, दुतगती महामार्ग आणि लॉजिस्टिक हब, कॉर्पोरेट पार्क आदींचे समांतर नियोजन सुरू आहे. त्यामुळे नवी मुंबई विमानतळ हा केवळ पर्यायी विमानतळ न राहता, पश्चिम भारताचे प्रमुख आंतरराष्ट्रीय हवाई केंद्र बनण्याच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
"नवी मुंबई विमानतळ हे भविष्यातील नियोजनाचे मॉडेल' ठरत आहे. त्यामुळे हा निर्णय तातडीचा नसून दीर्घकालीन उपाययोजनांचा भाग आहे. त्यादृष्टीने विमानतळावर तिसरी समांतर धावपट्टी उभारण्याच्या दृष्टीने तांत्रिक-व्यावसायिक व्यवहार्यता अभ्यासासाठी सल्लागार नियुक्तीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे." -विजय सिंघल, व्यवस्थापकीय संचालक, सिडको