शिल्लक घरांच्या विक्रीला दसऱ्याचा मुहूर्त

By Admin | Updated: October 11, 2016 03:43 IST2016-10-11T03:43:17+5:302016-10-11T03:43:17+5:30

खासगी विकासकांप्रमाणे सिडकोनेही आपल्या विविध प्रकल्पांतील शिल्लक घरांच्या विक्रीसाठी दसऱ्याचा मुहूर्त साधला आहे

Third house sale | शिल्लक घरांच्या विक्रीला दसऱ्याचा मुहूर्त

शिल्लक घरांच्या विक्रीला दसऱ्याचा मुहूर्त

नवी मुंबई : खासगी विकासकांप्रमाणे सिडकोनेही आपल्या विविध प्रकल्पांतील शिल्लक घरांच्या विक्रीसाठी दसऱ्याचा मुहूर्त साधला आहे. त्यानुसार खारघर व उलवे येथील गृहप्रकल्पात विक्रीविना पडून असलेल्या ४00 सदनिकांची पुन्हा सोडत काढण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे.
गेल्या काही वर्षांत जमिनीच्या किमती गगनाला भिडल्याने स्वस्त व परवडणारी घरे बांधणे विकासकांना अवघड होवून बसले आहे. त्यामुळे वर्षानुवर्षे बजेटमधील घरांच्या प्रतीक्षेत असलेल्या सर्वसामान्य ग्राहकांची परवड होत आहे. असे असले तरी सिडकोच्या घरांना नेहमीच ग्राहकांची पसंती राहिली आहे. त्यामुळे ग्राहक सिडकोच्या आगामी गृहप्रकल्पाकडे डोळे लावून बसले आहेत. परंतु अशा ग्राहकांना सिडकोने दसऱ्याच्या मुहूर्तावर घर खरेदीची आणखी एक संधी उपलब्ध करून दिली आहे.
खारघर येथील व्हॅलिशिल्प, वास्तुविहार,सेलिब्रेशन आणि उलवे येथील उन्नती गृहप्रकल्पातील ४00 घरे विक्रीविना पडून आहेत. सिडकोने जाहीर केल्याप्रमाणे या घरांची किंमत कमीत कमी १३ लाख व जास्तीत जास्त १ कोटी ४७ लाख रुपये इतकी आहे. विशेष म्हणजे ही घरे विविध आरक्षण संवर्गातील आहेत.
खारघर सेक्टर १५ येथे सहा वर्षांपूर्वी उभारलेल्या वास्तुविहार आणि सेलिब्रेशन गृहप्रकल्पात विविध क्षेत्रफळांची एकूण ९४ घरे शिल्लक आहेत. विविध प्रवर्गासाठी आरक्षित असलेल्या घरांची किंमत घराच्या क्षेत्रफळानुसार १२ लाख ते ७८ लाख रुपये इतकी आहे. उलवे येथील उन्नती गृहप्रकल्पात यूएल-१ टाईपची ६0 तर यूएल-२ टाईपची १४ घरे शिल्लक आहेत. या घरांची किमत १३ ते २५ लाखांच्या दरम्यान आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Third house sale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.