बस थांब्यासमोरील रिक्षांचे गॅरेज जैसे थेच; प्रवाशांची कसरत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2019 00:29 IST2019-12-19T00:29:08+5:302019-12-19T00:29:16+5:30

कोपरखैरणेतील प्रकार : वाहतूककोंडीची समस्या

Things like garages in front of bus stops; Travelers' Workout | बस थांब्यासमोरील रिक्षांचे गॅरेज जैसे थेच; प्रवाशांची कसरत

बस थांब्यासमोरील रिक्षांचे गॅरेज जैसे थेच; प्रवाशांची कसरत

नवी मुंबई : कोपरखैरणे येथील जीमी टॉवरच्या समोर स्मशानभूमीच्या अगदी प्रवेशद्वाराजवळ असलेल्या एनएमएमटी बस थांब्याला दुरुस्तीसाठी आलेल्या रिक्षांचा वेढा पडत आहे. अगदी बस थांब्याच्या समोरच रिक्षांच्या दुरुस्तीची कामे केली जात असल्याने बसचालकांसह प्रवाशांची मोठी तारांबळ उडत आहे. त्यामुळे वाहतूककोंडीची कायमस्वरूपी समस्या निर्माण झाली असून, प्रसंगी अपघाताची शक्यता वाढली आहे.


नवी मुंबईत वसाहतीअंतर्गत रस्त्यावरील बेकायदा पार्किंगचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनू लागला आहे. रस्त्यावर दुतर्फा उभ्या असणाऱ्या वाहनांमुळे परिसरात वाहतूककोंडीची समस्या निर्माण झाली आहे. अगोदरच अरुंद असलेले रस्ते दुतर्फा वाहन पार्किंगमुळे आणखी निमुळते झाले आहेत. त्यामुळे एनएमएमटीसह स्कूल बसेसना अशा रस्त्यांतून मार्ग काढताना कसरत करावी लागत आहे. रुग्णवाहिकांचा तर अनेकदा खोळंबा झाल्याची उदाहरणे आहेत. रस्त्यांवरील दुतर्फा वाहन पार्किंग त्रासाची ठरत असतानाच आता एनएमएमटीच्या बसथांब्यासमोर अगदी रस्त्यावर थाटलेल्या वाहन दुरुस्तीच्या बेकायदा व्यवसायाने शहरवासीयांची डोकेदुखी वाढविली आहे. शहरवासीयांना एनएमएमटीच्या प्रवासी सेवेचा अधिकाधिक लाभ व्हावा, यादृष्टीने परिवहन उपक्रमाचे प्रयत्न आहेत. त्यानुसार अनेक भागांत गरजेनुसार एनएमएमटीच्या सेवा सुरू करण्यात आल्या आहेत. त्यासाठी आवश्यक तेथे बस थांबे उभारले आहेत. मात्र, आता हेच बस थांबे अनधिकृत गॅरेज व्यावसायिकांना आंदण ठरू लागले आहेत.


कोपरखैरणे येथील जीमी टॉवरसमोर असलेल्या स्मशानभूमीच्या प्रवेशद्वाराजवळच एनएमएमटीचा बस थांबा आहे. या बसथांब्यावर नेहमीच रिक्षांची दुरुस्ती सुरू आहे. समोरच गॅरेज असल्याने येथील कारागीर सर्रासपणे बस थांब्याच्या समोर रिक्षा उभ्या करून दुरुस्तीची कामे करतात. एका वेळी चार ते पाच रिक्षा उभ्या असतात. तसेच याच रस्त्याच्या अगदी समोरच्या बाजूलाही रिक्षांच्या रांगा लागलेल्या असतात. त्यामुळे येथे नेहमीच वाहतुकीची कोंडी होत असते. रिक्षांच्या दुरुस्तीचे काम अगदी बसथांब्याच्या समोरच केले जात असल्याने प्रवाशांची तारांबळ उडत आहे. बसचालकांनाही बस थांब्याचा अंदाज येत नसल्याने रस्त्याच्या मधोमध बस उभी करावी लागते. अशा परिस्थितीत बसमध्ये चढताना किंवा उतरताना प्रवाशांचा जीव टांगणीला लागलेला असतो. यासंदर्भात ‘लोकमत’ने वेळोवेळी वृत्त प्रसिद्ध केले आहे. मात्र, वाहतूक विभाग आणि महापालिकेच्या अर्थपूर्ण समझोत्यामुळे प्रवाशांच्या जीवाशी खेळणारे हे गॅरेज आजतागायत जैसे थे अवस्थेत सुरू असल्याचे दिसून आले आहे.

Web Title: Things like garages in front of bus stops; Travelers' Workout

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.