पाच वर्षापासून ते उचलतात श्वानांची विष्ठा
By नामदेव मोरे | Updated: February 13, 2024 16:51 IST2024-02-13T16:49:12+5:302024-02-13T16:51:03+5:30
स्वच्छता अभियानात योगदान, नवी मुंबईला नंबर वन बनविण्याचा निर्धार.

पाच वर्षापासून ते उचलतात श्वानांची विष्ठा
नामदेव मोरे,नवी मुंबई : नेरूळ सेक्टर ४ मध्ये राहणारे इंदरसिंग ठाकूर हे दक्ष नागरिक पाच वर्षापासून रोज रोड व पदपथांवरील श्वानांची विष्ठा उचलण्याचे काम करत आहेत. शहर स्वच्छतेमध्ये प्रत्येकाने खारीचा वाटा उचलला पाहिजे हे त्यांनी स्वकृतीतून दाखवून दिले आहे. नवी मुंबईला देशात नंबर १ बनविण्यासाठी त्यांच्या स्वच्छता अभियानातील या योगदानाचे शहरभर कौतुक होऊ लागले आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेने स्वच्छता अभियानामध्ये देशात दुसरा व राज्यात पहिला क्रमांक मिळविला आहे. शहरवासीयांच्या सक्रीय सहभागामुळे प्रत्येक वर्षी शहरांचे मानांकन वाढत आहे. अनेक नागरिक स्वच्छतेने शहर स्वच्छतेमध्ये महत्वाचे योगदान देत आहेत. यामध्ये नेरूळ सेक्टर ४ मधील पामबीच सोसायटीत राहणाऱ्या इंदरसिंग ठाकूर यांचाही समावेश आहे. स्वत:च्या व्यवसाय व सोसायटीचे सेक्रेटरी असलेले ठाकून मागील पाच वर्षांपासून रोज पहाटे पाच वाजता उठून संपूर्ण सेक्टरमधील रोड व पदपथावरील श्वानांची विष्ठा साफ करण्याचे काम करत आहेत. विष्ठा गोणीमध्ये संकलीत करून ती मोकळ्या भूखंडावर खड्डा काढून त्यामध्ये टाकली जाते.
सकाळी परिसरातील पदपथ व रस्त्यावरून नागरिक मॉर्नींग वॉक करत असतात. दिवसभरही ये - जा सुरू असते. श्वानांच्या विष्ठेमुळे अनेकांचे पाय भरतात. चालण्यास अडथळे निर्माण होतात. दुर्गंधी पसरते. या दुर्गंधीमधून नागरिकांची सुटका व्हावी यासाठी ठाकूर यांनी स्वच्छेने श्वानांची विष्ठा संकलीत करण्यास सुरुवात केली असून सातत्याने हे काम केले जात आहे. या कामाचे परिसरातील नागरिकांनीही कौतुक केले आहे.
प्रतिक्रिया :
स्वच्छता अभियानामध्ये आपले योगदान असावे या भुमीकेतून लॉकडाऊनच्या अगोदरपासून श्वानांची विष्ठा संकलीत करून परिसर स्वच्छ करण्यास सुरुवात केली आहे. शहराचा नागरिक म्हणून कर्तव्य भावनेतून हे काम सुरू आहे.- इंदरसिंग ठाकूर, सामाजिक कार्यकर्ते
काम सर्वांसाठी प्रेरणादायी :
नवी मुंबई महानगरपालिकेचे माजी शहर अभियंता मोहन डगावकर यांनीही ठाकू यांच्या कामाचे कौतुक केले आहे. अशा प्रकारे प्रत्येक नागरिकाने अभियानात योगदान दिले तर शहर अजून स्वच्छ होईल. श्वान मालकांनीही रोड व पदपथावर कचरा होणार नाही याची काळजी घ्यावी असे आवाहनही त्यांनी केले.