धोकादायक इमारतींच्या यादीत रेल्वे कॉलनी नाही
By Admin | Updated: June 1, 2016 03:00 IST2016-06-01T03:00:48+5:302016-06-01T03:00:48+5:30
शहरातील सर्वात धोकादायक इमारतींत जुईनगरमधील रेल्वे वसाहतीचा समावेश आहे. वसाहत रेल्वे प्रशासनाच्या अखत्यारीत असल्याने महापालिका त्या इमारती धोकादायक घोषित करू शकत नाही

धोकादायक इमारतींच्या यादीत रेल्वे कॉलनी नाही
नवी मुंबई : शहरातील सर्वात धोकादायक इमारतींत जुईनगरमधील रेल्वे वसाहतीचा समावेश आहे. वसाहत रेल्वे प्रशासनाच्या अखत्यारीत असल्याने महापालिका त्या इमारती धोकादायक घोषित करू शकत नाही. रेल्वे प्रशासन न्यायालयीन वाद सुरू असल्याचे कारण देत याकडे दुर्लक्ष करीत असून, त्यामुळे रेल्वेचे कर्मचारी व त्यांचा परिवार जीव मुठीत घेऊन जगत आहे.
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई महानगरपालिकेने शहरातील १८७ धोकादायक इमारतींची यादी जाहीर केली आहे. यामध्ये जुईनगर सेक्टर २२ मधील रेल्वे कॉलनीचा समावेश नाही. रेल्वे वसाहतीमध्ये जवळपास ६० इमारती आहेत. यामधील ३५ इमारतींमध्ये कामगार व अधिकारी परिवारासह वास्तव्य करीत आहेत. अनेक इमारती अर्धवट बांधकाम झालेल्या स्थितीमध्ये आहेत. पूर्णपणे मोडकळीस आल्याने काही इमारती खाली केल्या आहेत. वापर सुरू असलेल्या इमारतींची स्थितीही बिकट आहे. कोणत्याही क्षणी इमारत कोसळून शेकडो नागरिकांचा जीव जाण्याची शक्यता आहे. यानंतरही महापालिकेने या इमारती धोकादायक घोषित का केल्या नाहीत? रेल्वे वसाहत ही रेल्वे मंत्रालयाच्या अखत्यारीत आहे. तेथील नियोजनाचा अधिकारही रेल्वे प्रशासनाचा आहे. यामुळे इमारती धोकादायक घोषित करण्याची जबाबदारीही त्यांचीच आहे. परंतु प्रत्यक्षात रेल्वे प्रशासन या वसाहतीकडे दुर्लक्ष करीत आहे.
रेल्वे वसाहत बांधकाम सुरू असल्यापासून वादग्रस्त ठरली आहे. इमारती बांधणाऱ्या ठेकेदाराविषयी झालेल्या मतभेदानंतर हे प्रकरण न्यायालयात गेले आहे. अनेक इमारतींचे बांधकाम अर्धवट ठेवावे लागले आहे. न्यायप्रविष्ठ बाब असल्याने रेल्वे धोकादायक इमारतींची पुनर्बांधणी करीत नाही. मोडकळीस आलेल्या इमारती पाडतही नाही. किरकोळ दुरुस्ती करून त्यांचा वापर सुरू आहे. पावसाळ्यात ड्युटीवर गेलेल्या कामगारांना घरी जाईपर्यंत आपले कुटुंब सुरक्षित असेल का, याची चिंता सतावत असते.
स्थानिक नगरसेविका रूपाली भगत व ठाणे जिल्हा युवक काँगे्रसचे अध्यक्ष निशांत भगत यांनी येथील रहिवाशांचे प्रश्न सोडवण्यासाठी वारंवार रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा केला, परंतु प्रशासन ठोस निर्णय घेत नाही.
यामुळे इमारत कोसळून मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. एखादी दुर्घटना घडली तर त्याला जबाबदार कोण, असा प्रश्न रहिवाशी विचारू लागले आहेत.