चोरून तोडलेले खैराचे ओंडके जप्त
By Admin | Updated: March 10, 2016 02:15 IST2016-03-10T02:15:16+5:302016-03-10T02:15:16+5:30
खबऱ्याकडून माहिती मिळाल्यानंतर १० तास दबा धरून बसलेल्या कर्जत वन विभागाच्या हाती खैर या मौल्यवान झाडाच्या ओंडक्यांनी भरलेला ट्रक लागला आहे.

चोरून तोडलेले खैराचे ओंडके जप्त
कर्जत : खबऱ्याकडून माहिती मिळाल्यानंतर १० तास दबा धरून बसलेल्या कर्जत वन विभागाच्या हाती खैर या मौल्यवान झाडाच्या ओंडक्यांनी भरलेला ट्रक लागला आहे. कर्जत - मुरबाड रस्त्यावर हा ट्रक सोमवारी मध्यरात्री एक वाजता पकडण्यात आला असून, त्यात दोन लाखांचे खैराचे ओंडके सापडले. वन विभागाने ट्रकसह खैराचे ओंडके जप्त केले असून, मुद्देमालाची रक्कम १२ लाख रु. आहे.
कर्जतचे वन अधिकारी आर. बी. घाडगे यांना विश्वसनीय सूत्रांकडून खैराची चोरटी वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाली होती. तो माल शहापूर येथील शिरवली येथील वन विभागाच्या डेपोमधून निघाला होता. तेथे २ मार्चला खैर जातीच्या झाडाचे ओंडके रत्नागिरी येथे नेण्यासाठी १९० ओंडक्यांची परवानगी असलेला पास वन विभागाकडून घेण्यात आला. मात्र त्या ट्रकचालकाने नंतर पुढे मुरबाड तालुक्यातून गुप्त ठिकाणावरून त्या ट्रकमध्ये आणखी खैराचे ५१० ओंडके भरले. वन अधिकारी घाडगे यांनी तत्काळ मुरबाड-कर्जत रस्त्यावर सापळा लावून ठेवला. मध्यरात्रीनंतर मुरबाडकडून येणारा संशयास्पद ट्रक (एमएच-१२ एफझेड-९७३८) वन अधिकारी आणि कर्मचारीऱ्यांनी अडविला. वन विभागाने ट्रक आणि त्यातील माल जप्त करून पोही येथील वन विभागाच्या डेपोत जमा केला. जप्त केलेला ट्रक आणि त्यातील मौल्यवान खैर वृक्ष यांची किंमत १२ लाख असल्याची नोंद केली आहे. (वार्ताहर)