कार्गो वाहतूक नवी मुंबईहून झाल्यास राज्याला फायदा; वाहतूककोंडीवर मात करण्यास होणार मदत
By अतुल कुलकर्णी | Updated: December 18, 2025 07:12 IST2025-12-18T07:11:39+5:302025-12-18T07:12:28+5:30
जेएनपीए बंदरातून कृषी माल देशभर पोहोचविणे आता अधिक सोपे

कार्गो वाहतूक नवी मुंबईहून झाल्यास राज्याला फायदा; वाहतूककोंडीवर मात करण्यास होणार मदत
'एनएमआयए'चे फायदे/अपेक्षा : भाग ४
अतुल कुलकर्णी
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : जगभरातून मुंबईविमानतळावर २५ विमान कंपन्या मालवाहतूक करतात. त्यांची सगळी विमाने मुंबईत येतात. आपल्याकडे वर्षाला पाच लाख मेट्रिक टन सामानाची आयात-निर्यात होते. त्यात दर महिन्याला अंदाजे १७ हजार मेट्रिक टन सामानाची निर्यात, तर २३ हजार मेट्रिक टन सामानाची आयात होते. या सगळ्याचा परिणाम वाहतूक कोंडीवरही होतो. मोठ्या प्रमाणावर कार्गो वाहतूक नव्या मुंबईत नेली तर नवी मुंबईतून त्यांना अन्य राज्यात जाणे सोपे होईल, असे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे. तसेच त्या सगळ्या वेळा महाराष्ट्रातल्या प्रमुख शहरातून मुंबईला येऊ इच्छिणाऱ्या प्रवाशांसाठी उपलब्ध होऊ शकतात.
मुंबई विमानतळाने २४ तासांत १०३६ विमानांची वाहतूक करण्याचा विक्रम केला आहे. यावर बोलताना कौन्सिल ऑफ इंडियन एव्हिएशनचे अध्यक्ष नितीन जाधव म्हणाले, मुंबई विमानतळावर २४ तासांत अंदाजे ९५० विमाने येतात. त्यातली २५ कार्गो विमाने आहेत, तर जवळपास २५ विमाने प्रवासी आणि कार्गो दोन्हीची ने-आण करतात. (काही वर्षांपूर्वी मुंबई विमानतळावरून ७० कार्गो विमानांचे रोज येणे-जाणे झाले होते.) त्याशिवाय सध्या किमान २५ खासगी विमाने रोज मुंबईत ये-जा करतात. याचा अर्थ २५ कार्गो विमानांचे येणे-जाणे जर नवी मुंबई विमानतळावरून झाले तर तेवढ्या वेळा मुंबई विमानतळावर सहज उपलब्ध होतील, असाही तर्क जाधव यांनी दिला. याबाबत मुंबई विमानतळ प्रशासनाशी सातत्याने संपर्क साधूनही नेमकी किती कार्गो विमानांची वाहतूक होते, ती माहिती मिळू शकली नाही.
सध्याच्या स्थितीत मुंबई विमानतळावर क्रॉस रन-वेमुळे कार्गो विमानाच्या हाताळणीस मर्यादा आहेत. मुंबई विमानतळावर दोन रनवे असले तरी ते क्रॉस रनवे आहेत. त्यामुळे एकावेळी एकच विमान येऊ किंवा जाऊ शकते. असे असतानाही मुंबई विमानतळाने २४ तासांत जास्तीत जास्त म्हणजे १०३३ विमानांची वाहतूक करण्याचा विक्रम केला आहे. दिल्लीला सरळ रेषेत चार रन-वे असूनही तिथे २४ तासांत १५०० विमानांची वाहतूक झाली आहे. आता नवी मुंबई विमानतळामुळे कार्गोसाठी जास्तीच्या वेळा उपलब्ध होऊ शकतात. शेतमालाला तसेच फार्मा इंडस्ट्रीसाठी याचा फायदा होऊ शकतो. शिवाय मुंबईतील कार्यों वाहतूक मोठचा प्रमाणावर नवी मुंबईत शिफ्ट केली आणि तेवढ्या वेळा अन्य प्रवासी विमानांसाठी मुंबईत उपलब्ध करून दिल्या तर त्याचा मोठा फायदा दोन्ही बाजूने होऊ शकतो.
नवी मुंबई विमानतळावरून होणाऱ्या कार्गो वाहतुकीचा फायदा पुणे, नाशिक, रायगड या जिल्ह्यांना तसेच ठाणे-बेलापूर औद्योगिक वसाहत तसेच पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्याच्या काही भाग होणार आहे. नवी मुंबईत एपीएमसीची वर्षाला १० ते १२ हजार कोर्टीची उलाढाल आहे. १०० कोर्टीचा महसूल सरकारला मिळत आहे. 'एनएमआयए 'वरून कार्गो वाहतूक सुरू झाली तर आंबे, द्राक्ष आणि कांदा यांना सगळ्यात मोठा फायदा होईल होऊ शकतो. या विमानतळापासून जेएनपीए बंदर जवळच आहे त्यामुळे तेथील मालाचीदेखील विमानतळावरून देशभरात पोहोचवणे सोपे होणार आहे. या विमानतळामुळे आजूबाजूच्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर फायदा होईल. त्यांची आर्थिक सक्षमता वाढेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला होता.
कार्गो वाहतूक करणाऱ्या विमान कंपन्या
ब्लू डार्ट, एरो लॉजिक, चॅलेंज एअर कार्गो, सिल्क वे वेस्ट एअरलाइन्स, एअर फ्रान्स, चायना एअरलाइन्स, कॅथे पॅसिफिक, इथिओपियन एअरलाइन्स, फेडएक्स, लुफ्थान्सा, कतार एअरवेज, सिंगापूर एअरलाइन्स, टर्किश एअरलाइन्स, ओमान एअर, मलेशिया एअरलाइन्स, एअर मॉरिशस, एअर टांझानिया, इंडिगो कार्गो, केनिया एअरवेज, यूपीएस, केएलएम, एमिरेट्स, सौदिया एअरलाइन्स, एतिहाद.