नवी मुंबईतील १३७ एकरवरील पर्यटनस्थळ झाले प्रदुषणमुक्त
By नामदेव मोरे | Updated: May 3, 2024 19:00 IST2024-05-03T18:59:43+5:302024-05-03T19:00:28+5:30
ज्वेल्सजवळ महापालिकेने उभारले मलउदंचन केंद्र : नाल्यातील सांडपाणी मलनिस्सारण केंद्राकडे वळविले

नवी मुंबईतील १३७ एकरवरील पर्यटनस्थळ झाले प्रदुषणमुक्त
नवी मुंबई : नेरूळ विभागातील सांडपाणी अनेक वर्षे नाल्याचे पाणी ज्वेल्सच्या होल्डिंग पाँडमध्ये मिसळत होते. त्यामुळे या परिसरात दुर्गंधी निर्माण होत होती. ती सोडविण्यासाठी महापालिकेने मलउदंचन केंद्र उभारले आहे. या परिसरातील सांडपाणी सेक्टर ५० मधील मलनिस्सारण केंद्रात सोडण्यास सुरुवात झाली असून त्यामुळे पर्यटनस्थळ असलेला ज्वेल्स परिसर प्रदूषणमुक्त झाला आहे.
नवी मुंबई महापालिकेने पामबीच रोडला लागून नेरूळ येथे १३७ एकर भूखंडावर ज्वेल्स ऑफ नवी मुंबई विकसित केले आहे. ६४ एकरांवर होल्डिंग पाँड, ८ एकरवर छोटा नैसर्गिक तलाव, १५ एकरवर वॉकवे व ३५ एकर भूखंडावर देशातील सर्वांत मोठे मियावाकी जंगल उभे केले आहे. या ठिकाणी रोज ५ हजारापेक्षा जास्त नागरिक सकाळी व सायंकाळी फिरण्यासाठी व व्यायामासाठी येत असतात. हा परिसर पर्यटनस्थळ म्हणून विकसित झाला आहे. परंतु, नेरूळ विभागातील सांडपाणी मुख्य वाहिनीमधून मलनिस्सारण केंद्रामध्ये घेऊन जाण्यास अडथळा निर्माण होत असल्यामुळे ते होल्डिंग पाँडमध्ये मिसळत असल्याने आहोटीच्या वेळी त्यामधून प्रचंड दुर्गंधी निर्माण होत होती.
होल्डिंग पाँडमध्ये सांडपाणी जाऊ नये यासाठी महानगरपालिकेने २ एमएलडी क्षमतेचे मलउदंचन केंद्र उभारून त्याद्वारे सांडपाणी खेचून ते सेक्टर ५० मधील अत्याधुनिक मलनिस्सारण केंद्राकडे वळविले आहे. त्यामुळे आता नेरूळ विभागातील सांडपाणी होल्डिंग पाँडमध्ये जावून होणारे प्रदूषण थांबले आहे. यामुळे निर्माण होणारी दुर्गंधीही थांबली असून नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
काय होती समस्या?
नेरूळ गाव व परिसरातील सांडपाणी वाहून नेणारी वाहिनी व मुख्य मलनिस्सारण वाहिनी समपातळीवर नसल्याने सांडपाणी मलनिस्सारण केंद्रामध्ये जात नव्हती. परिणामी सांडपाणी नैसर्गिक नाल्यांतून खाडीत जात होती. सांडपाणी होल्डिंग पाँडमध्ये मिसळून प्रदूषण निर्माण होत होते. मलउदंचन केंद्रामुळे आता सांडपाणी थेट सेक्टर ५० च्या मलनिस:रण केंद्रामध्ये सोडले जात असूनही समस्या सुटली आहे.
नेरूळ विभागातील सांडपाणी सेक्टर ५० मधील मलनिस्सारण केंद्रामध्ये घेवून जाण्यासाठी ज्वेल्सच्या कोपऱ्यात २ एमएलडी क्षमतेचे मलउदंचन केंद्र तयार केले आहे. यामुळे सांडपाणी नाल्यात मिसळण्याची समस्या सुटली आहे.-संजय देसाई, शहर अभियंता महानगरपालिका