आंतरराष्ट्रीय विमानतळपूर्व विकासकामांच्या निविदा प्रक्रिया पूर्ण
By Admin | Updated: March 9, 2017 02:48 IST2017-03-09T02:48:21+5:302017-03-09T02:48:21+5:30
आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या मार्गात येणाऱ्या उलवा टेकडीची उंची कमी करण्याबरोबरच गाढी नदीचे पात्र बदलणे, जमिनीचे सपाटीकरण व उच्च दाबाच्या विद्युत वाहिन्या

आंतरराष्ट्रीय विमानतळपूर्व विकासकामांच्या निविदा प्रक्रिया पूर्ण
नवी मुंबई : आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या मार्गात येणाऱ्या उलवा टेकडीची उंची कमी करण्याबरोबरच गाढी नदीचे पात्र बदलणे, जमिनीचे सपाटीकरण व उच्च दाबाच्या विद्युत वाहिन्या भूमिगत करणे या विमानतळपूर्व कामांसाठी सिडकोने निविदा काढल्या आहेत. सुमारे १७00 कोटी रुपये खर्चाच्या या कामांना लवकरच सुरुवात होण्याची शक्यता संबंधित विभागाकडून वर्तविण्यात आली आहे.
प्रस्तावित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या मार्गातील बहुतांशी अडथळे दूर झाले आहेत. आर्थिक निविदा प्रक्रियाही पूर्ण झाली आहे. त्यामुळे सिडकोने आता विमानतळपूर्व विकासकामांवर आपले लक्ष केंद्रित केले आहे. पहिल्या टप्प्यात उलवा टेकडीची उंची कमी करणे, गाढी नदीचे पात्र बदलणे, जमीन सपाटीकरण व उच्च दाबाच्या विद्युत वाहिन्या भूमिगत करणे आदी प्रमुख कामांचा यात समावेश आहे. प्रमुख अडथळा ठरणाऱ्या उलवे टेकडीची उंची ९२ मीटर इतकी असून विमानतळाच्या धावपट्टीच्या मार्गात या टेकडीचा अडथळा ठरत आहे. त्यामुळे या टेकडीची उंची आठ मीटरने कमी करावी लागणार आहे. या कामासाठी दीड ते दोन वर्षांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे, तसेच गाढी नदीचे पात्र बदलणे आवश्यक आहे.
जमिनीचे सपाटीकरण करण्याची कार्यवाही यापूर्वीच सुरू करण्यात आली आहे, तर उच्च दाबाच्या विद्युत वाहिन्या भूमिगत करण्यासाठी निविदा मागविण्यात आल्या आहेत.
प्रस्तावित नवी मुंबई विमानतळावरून २0१९ मध्ये विमानाचे टेकआॅफ करण्याच्या दृष्टीने सिडकोने कंबर कसली आहे. त्या पार्श्वभूमीवर विमानतळपूर्व विकासकामांना पुढील काळात गती प्राप्त होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. (प्रतिनिधी)