दुकानातील आगीमुळे दहा लाखांचे नुकसान
By Admin | Updated: June 6, 2016 01:35 IST2016-06-06T01:35:36+5:302016-06-06T01:35:36+5:30
शहरातील पीएनपीनगर येथील तळमजल्यावरील गाळ्यामध्ये असलेल्या संगीता शृंगार सेंटरला रविवारी पहाटेच्या सुमारास अचानक आग लागली.

दुकानातील आगीमुळे दहा लाखांचे नुकसान
अलिबाग : शहरातील पीएनपीनगर येथील तळमजल्यावरील गाळ्यामध्ये असलेल्या संगीता शृंगार सेंटरला रविवारी पहाटेच्या सुमारास अचानक आग लागली. यात एकूण सुमारे दहा लाख रु पयांचा ऐवज जळून खाक झाला. अलिबाग नगरपालिका व आरसीएफच्या अग्निशमन दलाने वेळेवर येऊन अखेर आग आटोक्यात आणली. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. शॉर्टसर्किटमुळे आग लागली असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.
अलिबाग तालुक्यातील सहाणगोठी येथील जयदीप शंकर तुणतुणे यांच्या मालकीच्या पीएनपी नगर येथील एका इमारतीमध्ये तळमजल्यावरील गाळ्यामध्ये संगीता शृंगार सेंटर नावाचे दुकान होते. गेले अनेक वर्षांपासून त्या ठिकाणी दुकान आहे. रु पाली तुणतुणे दुकान सांभाळत होत्या. ५ जून रोजी सकाळी चार ते साडेचार वाजण्याच्या सुमारास अचानक दुकानाला आग लागली. हळूहळू आग वाढू लागली. ही बाब दुकानाच्या मालकांच्या लक्षात आल्यावर त्यांनी धाव घेतली. पोलिसांशी संपर्क साधून या घटनेची माहिती दिली. या घटनेची माहिती अलिबाग पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच आग विझविण्यासाठी अलिबाग नगरपालिका व आरसीएफ कंपनीचे अग्निशमन दल धावून आले. तब्बल दीड ते दोन तास आग सुरु होती. शर्थीचे प्रयत्न करून सकाळी सहा ते सव्वा सहा वाजण्याच्या सुमारास अग्निशमन दलामार्फत आग विझविण्यास यश आले. या आगीमध्ये कॉस्मेटिक व इतर जनरल साहित्य, तसेच टेलरिंगचे मटेरियल्स, फॉल बिडिंगच्या साड्या व दुकानातील अन्य काही वस्तू असे एकूण दहा लाख रु पयांचे आर्थिक नुकसान झाले.
सुदैवाने जीवितहानी टळली. पहाटेच्यावेळी विद्युत सेवेचा खेळखंडोबा सुरु असल्याने स्पार्क होऊन आग लागली असल्याचेही म्हणणे असून याप्रकरणी अलिबाग पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)