मेट्रो पुलाच्या कामाला तात्पुरती स्थगिती
By Admin | Updated: December 22, 2015 00:47 IST2015-12-22T00:47:18+5:302015-12-22T00:47:18+5:30
सिडकोच्यावतीने हाती घेण्यात आलेल्या बेलापूर ते पेंधर मेट्रो पुलाच्या स्लॅबचे काम करण्यासाठी सायन - पनवेल महामार्गावर सीबीडीमध्ये सोमवारपासून वाहतुकीत बदल करण्यात येणार होता.

मेट्रो पुलाच्या कामाला तात्पुरती स्थगिती
नवी मुंबई : सिडकोच्यावतीने हाती घेण्यात आलेल्या बेलापूर ते पेंधर मेट्रो पुलाच्या स्लॅबचे काम करण्यासाठी सायन - पनवेल महामार्गावर सीबीडीमध्ये सोमवारपासून वाहतुकीत बदल करण्यात येणार होता. पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर अवजड व प्रवासी वाहनांना प्रवेशबंदी केली असून वाहतूक व्यवस्थेमध्ये बदल केला जाणार होता. या मेट्रोच्या पुलाचे हे काम तात्पुरते थांबविले असून येत्या आठवड्याभरात या कामाला सुरुवात केली जाणार आहे. याकरिता पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या एसटी महामंडळाचे बसस्थानक २०० मीटर अंतरापर्यंत पुढे सरकावून उड्डाणपुलाच्या शेवटच्या टोकापलीकडे बसथांबे हलविण्यात येणार असून याबाबत पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या प्रवाशांना या कामामुळे कसल्याही प्रकारचा व्यत्यय निर्माण होऊ नये याची दखल घेतली जाणार आहे.
सोमवारी या मार्गाची पाहणी करण्यात आली असून वास्तविक कामाला लवकरच सुरुवात केली जाणार आहे. यामध्य पुणेच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावरील तीन लेनपैकी दोन लेन सुरू ठेवल्या असून पुलावरून येणारी एक लेन बंद ठेवली जाणार आहे.
काम हाती घेतल्यावर अवजड वाहनांना सीबीडी उड्डाणपुलाखालून प्रवेशबंदी केली जाणार असून या वाहनांना सीबीडी सर्कल येथून डावीकडे वळण घेत उरण फाटा पुलाच्या खालून यू टर्न घेऊन सीबीडी उड्डाणपुलावरुन पुण्याकडे जाता येणार आहे. (प्रतिनिधी)