महापालिका घेणार तात्पुरते मनुष्यबळ
By Admin | Updated: October 15, 2016 07:01 IST2016-10-15T07:01:15+5:302016-10-15T07:01:15+5:30
पनवेल महानगरपालिकेत वसाहती वर्ग करण्यास सिडको इच्छुक आहे. तशी तयारीही सिडकोकडून सुरू आहे. मात्र हा डोलारा सांभाळण्याकरिता पनवेल महापालिकेकडे

महापालिका घेणार तात्पुरते मनुष्यबळ
अरुणकुमार मेहत्रे / कळंबोली
पनवेल महानगरपालिकेत वसाहती वर्ग करण्यास सिडको इच्छुक आहे. तशी तयारीही सिडकोकडून सुरू आहे. मात्र हा डोलारा सांभाळण्याकरिता पनवेल महापालिकेकडे सध्या पुरेसे मनुष्यबळ नाही. त्यामुळे महापालिकेच्यावतीने प्रतिनियुक्तीवर अभियंते घेण्याबाबत सिडकोकडे प्रस्ताव सादर करण्यात आला असून त्यास सकारात्मक प्रतिसादही देण्यात आला आहे.
नवीन पनवेल आणि खांदा वसाहत हा परिसर आधी पनवेल नगरपालिका क्षेत्रात असला तरी नियोजन प्राधिकरण म्हणून सिडको काम करीत असल्याने पायाभूत सुविधाही सिडकोकडून पुरविण्यात येत होत्या. आता जवळपास सगळ्या विकसित वसाहती महापालिकेत समाविष्ट करण्यात आल्या आहेत.
सिडको वसाहतीमध्ये यापुढे बांधकाम करायचे असेल तर त्याकरिता लागणारी परवानगी सिडकोने देणे बंद केले आहे. आता पनवेल शहर महानगरपालिकेकडून परवानगी देण्यात येणार आहे. एकंदरीतच सिडको प्रशासनाने हे अधिकार महापालिकेला वर्ग केले आहेत. परंतु सध्या पनवेल महापालिकेकडे अभियंते आणि इतर मनुष्यबळाची कमतरता आहे. नवीन पनवेल, कळंबोली, खारघर, कामोठे या सिडको वसाहतीत बांधकाम परवानग्या देण्याकरिता उपलब्ध मनुष्यबळ पुरेसे नाही. त्याकरिता महानगरपालिकेने नवीन भरती होईपर्यंत सिडकोकडून प्रतिनियुक्तीवर मनुष्यबळ मागितले आहे. तसा प्रस्तावही सिडको प्रशासनाला दिला आहे. यासंदर्भात बैठक सुध्दा झाली असल्याची माहिती समोर येत आहे.
सिडकोकडून तात्पुरत्या स्वरूपात अभियंते आणि इतर मनुष्यबळ मिळाले तर प्रशासनाला काम करणे सोपे जाईल. त्याचबरोबर पाणीपुरवठा व घनकचरा व्यवस्थापन सुध्दा महापालिकेकडे वर्ग होणार आहे. ते सुध्दा तात्पुरत्या स्वरूपात सिडकोकडून घेण्याबाबत प्रशासन विचाराधीन आहे. महापालिकेच्या मागणीप्रमाणे आम्ही तात्पुरत्या स्वरूपात अधिकारी आणि कर्मचारी देण्याबाबत सकारात्मक असल्याचे सिडकोच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.