इंस्टाग्राम रील बनवण्याच्या वेडात लोक अनेकदा स्वतःच्या आणि इतरांच्या जीवाशी खेळ करताना दिसतात. अशा घटनांमध्ये अनेकदा मोठे अपघात घडतात. नुकताच नवी मुंबईतील नेरुळ रेल्वे स्थानकावर (Nerul Railway Station) असाच एक हृदयद्रावक प्रकार घडला आहे. रीलच्या नादात एका अल्पवयीन मुलाने आपला जीव गमावला आहे.
नेरुळ रेल्वे स्थानकावर कचरा आणि मातीने भरलेल्या, उभ्या असलेल्या ट्रेनच्या डब्यावर चढून सोशल मीडियासाठी रील बनवण्याचा प्रयत्न करत असताना एका १६ वर्षांच्या मुलाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. वाशी रेल्वे पोलिसांचे वरिष्ठ निरीक्षक किरण उंद्रे यांनी दिलेल्या माहितीनुसार, नवी मुंबईतील बेलापूर येथे राहणारा आरव श्रीवास्तव नावाचा हा मुलगा ६ जुलै रोजी आपल्या मित्रांसोबत रेल्वे स्थानकावर गेला होता. तो कचऱ्याने भरलेल्या, एकाच ठिकाणी उभ्या असलेल्या ट्रेनच्या डब्यावर चढला आणि रील बनवण्याचा प्रयत्न करत होता.
विद्युत तारेला स्पर्श झाला अन्..
अधिकाऱ्यांनी पुढे सांगितलं की, डब्यावर चढत असताना आरवचा हात वरून जाणाऱ्या उच्च दाबाच्या विद्युत तारेला (High Power Cable) लागला. यामुळे त्याला विजेचा जोरदार धक्का बसला आणि तो खाली पडला. या धक्क्यामुळे मुलाच्या डोक्याला आणि शरीराच्या इतर भागांना गंभीर दुखापती झाल्या होत्या. तो ६० ते ६५ टक्के भाजला होता. आरवला सुरुवातीला एका स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं, असं उंद्रे यांनी सांगितलं.
आरवची प्रकृती गंभीर असल्याने त्याला ऐरोली येथील बर्न्स रुग्णालयात (Burns Hospital) हलवण्यात आलं. तिथे तो सहा दिवस मृत्यूशी झुंज देत होता आणि अखेर शनिवारी रात्री त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून, घटनेची सखोल चौकशी सुरू असल्याचंही अधिकाऱ्यांनी सांगितलं.