‘शाळाबाह्य’ने शिक्षकांची दमछाक
By Admin | Updated: October 26, 2015 23:58 IST2015-10-26T23:58:33+5:302015-10-26T23:58:33+5:30
उद्याचा नागरिक घडवित असताना प्रत्येक शिक्षक आपले सर्वस्व पणाला लावून विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करतात.

‘शाळाबाह्य’ने शिक्षकांची दमछाक
प्राची सोनवणे, नवी मुंबई
उद्याचा नागरिक घडवित असताना प्रत्येक शिक्षक आपले सर्वस्व पणाला लावून विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करतात. मात्र सध्या शिक्षणव्यवस्थेने लादलेल्या अशैक्षणिक कामाच्या बोजामुळे शिक्षकांची दमछाक होत असल्याने कामाच्या अतिरिक्त ताणामुळे विद्यार्थ्यांकडे मात्र दुर्लक्ष होत आहे.
जनगणना, शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण, मतदार याद्यांचे पुनर्गठण, शालेय पोषण आहार त्यात नव्याने भर पडलेल्या ‘सरल’ विद्यार्थ्यांची माहिती भरणे या सर्वच कामांमुळे शिक्षकवर्ग प्रचंड तणावाखाली वावरत असून विद्यार्थ्यांना शिकवायचे कधी, असा प्रश्न पडतो. ऐन परीक्षेच्या कालावधीत शिक्षकांना अशा अशैक्षणिक कामात गुंतवल्याने याचा थेट परिणाम शाळेतील विद्यार्थी आणि त्यांच्या गुणवत्तेवर होत आहे.
राज्यातील सर्वच विद्यार्थ्यांची माहिती एकाच संकेत स्थळावर उपलब्ध व्हावी, याकरिता सरल प्रणालीच्या माध्यमातून आॅनलाइन माहिती भरण्याची प्रक्रिया शिक्षण विभागाकडून सुरु केली आहे. या प्रणालीचा वापर करताना वारंवार होणारा सर्व्हर डाऊन, रकाने भरण्याचे किचकट काम, सर्व विद्यार्थ्यांची कौटुंबिक माहिती त्यांचा रक्तगट या सर्वच कामांमुळे शिक्षकवर्ग मानसिकदृष्ट्या खचत असल्याचे पहायला मिळते. शिक्षकांबरोबरच मुख्याध्यापक, पालक, विद्यार्थी यांच्यासाठीही ही सरल प्रणाली तापदायक ठरली आहे. हे संकेत स्थळ रात्रीच्या वेळेत सुरळीतपणे सुरु असतात मात्र त्यावेळी यावर काम करणे शक्य नसते. परीक्षांचे आयोजन, शाळेतील उपक्रम, ठरावीक कालावधीत पूर्ण करावा लागणारा विषयाचा अभ्यासक्रम या साऱ्या गोष्टींसाठी मात्र शिक्षकांकडे पुरेसा वेळच मिळत नाही.
‘सरल’चे काम पूर्ण करण्यासाठी गेल्या काही महिन्यांपासून शालेय विद्यार्थ्यांच्या अध्यापनाचे कामकाज मात्र संथगतीने सुरु असल्याची तक्रार पालक करत आहे.
तसेच उत्पन्नाचा दाखला, रक्तगट तपासणी, आधारकार्ड क्रमांक, बँक खाते, जन्मखूण आदी कौटुंबिक माहिती संकलित करण्यासाठी पालकांचीही मोठ्या प्रमाणात धावपळ होत असल्याची माहिती शिक्षकांनी दिली.
लवकरच सुरू होणाऱ्या राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवही उपक्रमांतर्गत जनगणना सुरु होणार आहे. यामध्ये राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवही अद्ययावत करुन प्रत्येक नागरिकाचा आधार क्रमांक आणि मोबाइल नंबर नोंदवून डाटा बेस तयार केला जाणार आहे. २०११ मध्ये जनगणनेप्रसंगी यादीतील स्थलांतरित वा निधन झालेल्यांची नावे वगळणे व नवीन रहिवाशी किंवा जन्म झालेल्या व्यक्तींची नावेही यामध्ये अंतर्भूत करावयाची आहे. या कामासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांसह खाजगी शाळांतील शिक्षकांना नियुक्त करण्यात आले आहे.
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघटनेच्या नवी मुंबई शाखेचे अध्यक्षांनी शिक्षकांना अशैक्षणिक कामे देऊ नये यासाठी २९ जून रोजी बीएलओ संदर्भातील (याचिका क्र. ५७३६) आणि ९ आॅक्टोबर रोजी एनपीआर संदर्भातील (याचिका क्र. ९९८८)अशा दोन जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल केल्या होत्या. यावर सुनावणी होऊन न्यायालयाने शिक्षकांना देण्यात येणाऱ्या अशैक्षणिक कामांना स्थगिती देण्याचा महत्त्वाचा निर्णय देण्यात आला. शासनाच्या या निर्णयामुळे सर्वच शिक्षकवर्गात आनंदाचे वातावरण असून या अशैक्षणिक कामातून सुटका झाल्याने प्रत्येक शिक्षकाला विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेकडे अधिक लक्ष देऊन विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा आलेख उंचावण्यासाठी पुरेसा वेळ मिळेल अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण संघटनेचे नवी मुंबईचे शाख्या अध्यक्ष हृदयनाथ तांडेल यांनी व्यक्त केले आहे.