शिक्षक तीन महिने पगाराविना
By Admin | Updated: September 3, 2015 23:34 IST2015-09-03T23:34:59+5:302015-09-03T23:34:59+5:30
महापालिकेच्या शाळांमध्ये ठोक मानधनावर काम करणाऱ्या शिक्षकांना तीन महिन्यांपासून पगार देण्यात आलेला नाही. बहुतांश शिक्षक घर भाड्याने घेवून राहत आहेत

शिक्षक तीन महिने पगाराविना
नवी मुंबई : महापालिकेच्या शाळांमध्ये ठोक मानधनावर काम करणाऱ्या शिक्षकांना तीन महिन्यांपासून पगार देण्यात आलेला नाही. बहुतांश शिक्षक घर भाड्याने घेवून राहत आहेत. पगारच नसल्याने अनेकांच्या घराचे भाडे थकले आहे. विनावेतन विद्यादानाचे काम करणाऱ्या शिक्षकांना कर्ज घेवून घरखर्च भागवावा लागत आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता असल्यामुळे प्रशासनाने ठोक मानधनावर सव्वाशे शिक्षकांची नियुक्ती केली आहे. २०१० पासून हे शिक्षक विद्यादानाचे काम करत आहेत. पहिली तीन वर्षे ५ हजार रुपये मानधनावर काम केले. त्यानंतर मानधन ७ हजार रुपये करण्यात आले आहे. गतवर्षी शिक्षकांना १२ हजार रुपये मानधन देण्याचा ठराव महासभेने मंजूर केला आहे. मे महिन्यामध्ये सुटी असल्यामुळे ठोक मानधनावरील शिक्षकांना एक महिना वेतन देण्यात आले नव्हते. जूनमध्ये शाळा सुरू झाल्यानंतर शिक्षक पुन्हा कामावर रुजू झाले. तीन महिने झाल्यानंतरही अद्याप त्यांना पगार मिळालेला नाही. घरात सण साजरे करणे सोडाच परंतु ज्या घरात राहतो त्याचे भाडे देणेही शक्य नाही. एकीकडे घरमालक भाडे मागण्यासाठी तगादा लावत आहे. किराणा साहित्यही उधारीवर मागून आणावे लागत आहे. भावी पिढी घडविणाऱ्या शिक्षकांची स्थिती शहरातील कंत्राटी कामगारांपेक्षाही वाईट झाली आहे. पालिकेला अडचणीच्या काळात मदत करणाऱ्या या शिक्षकांना कायम सेवेत घेतले जाणार नसल्याचे सांगितले जात आहे.
ठोक मानधनावरील शिक्षकांची व्यथा कोणीही समजून घेत नाही. त्यांच्या वेतनामध्ये वाढ झाल्यामुळे सर्व्हिस टॅक्सचा विषय निर्माण झाला. त्याविषयी फाईलवर्क करण्यात वेळ गेल्यामुळे अद्याप वेतन देण्यात आले नसल्याचे सांगितले जात आहे. परंतु विनावेतन शिक्षक घर कसे चालवतील याचा विचार कोणीच केलेला नाही. शक्य तितक्या लवकर वेतन देण्यात यावे अशी मागणी शिक्षक करू लागले आहेत. शिक्षण अधिकारी दत्तात्रेय नांगरे यांच्याशी संपर्क साधला असता दोन ते तीन दिवसांमध्ये वेतन देण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.