शिक्षक, पदवीधर निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर; १ लाख ७७ हजार ३२ मतदार
By कमलाकर कांबळे | Updated: May 28, 2024 19:51 IST2024-05-28T19:50:34+5:302024-05-28T19:51:06+5:30
विधानपरिषदेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर, कोकण विभाग शिक्षक, पदवीधर मतदारसंघात २६ जून रोजी मतदान

शिक्षक, पदवीधर निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर; १ लाख ७७ हजार ३२ मतदार
नवी मुंबई : विधान परिषदेच्या मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण विभाग पदवीधर मतदारसंघाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. कोकण विभागाच्या सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त तथा सह निवडणूक अधिकारी अमोल यादव यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन यासंबंधीची माहिती दिली.
या निवडणुकीसाठी बुधवार, २६ जून रोजी मतदान होणार असल्याचे त्यांनी सांगितले. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार शुक्रवार, ३१ मे रोजी निवडणुकीची अधिसूचना जारी केली जाणार आहे. त्यानुसार या निवडणुकीसाठी ७ जून रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत इच्छुकांना उमेदवारी अर्ज सादर करता येणार आहे. उमेदवारांनी दाखल केलेल्या नामनिर्देशनपत्रांची छाननी १० जून रोजी सकाळी ११ वाजेपासून केली जाईल. तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत १२ जून दुपारी ३ वाजेपर्यंत असेल, अशी माहिती अमोल यादव यांनी दिली.
२६ जून रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ४ या वेळेत मतदान होईल. तर १ जुलै रोजी सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणीस सुरूवात होईल. ही संपूर्ण निवडणूक प्रक्रिया शुक्रवार, ५ जुलै रोजी पूर्ण होईल, असे यादव यांनी स्पष्ट केले आहे. आचारसंहितेबाबत माहिती देताना उपआयुक्त अमोल यादव म्हणाले की, कोकण विभागात जिल्हास्तरावर आचारसंहिता स्थायी समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीत जिल्हाधिकारी व राजकीय पक्षांचे प्रतिनिधी यांचा समावेश असेल. जिल्हास्तरावर तक्रार निवारण कक्ष, माध्यम प्रमाणीकरण व देखरेख समिती व भरारी पथक स्थापन करण्यात आले आहे. या पत्रकार परिषदेस उपआयुक्त (करमणूक) संजीव पालांडे, कोकण विभागीय माहिती उपसंचालक डॉ. गणेश मुळे उपस्थित होते.
१ लाख ७७ हजार ३२ मतदार
मुंबई पदवीधर मतदारसंघात स्त्री ३७ हजार ६१९ तर पुरुष ५३ हजार ६४१ असे एकूण ९१ हजार २६३ मतदार आहेत. तर मुंबई शिक्षक स्त्री १० हजार ८४९ , तर पुरुष ३ हजार ६६६ असे एकूण १४ हजार ५१५ मतदार आहेत. त्याचप्रमाणे कोकण विभाग पदवीधर मतदारसंघात स्त्री ७४ हजार ५७५, तर पुरुष १ लाख २ हजार ४४२ असे एकूण १ लाख ७७ हजार ३२ मतदार आहेत. यात २८ मे रोजी नोंदणी होणाऱ्या पदवीधर मतदारांची संख्या वाढण्याची शक्यता असल्याचे यादव यांनी स्पष्ट केले आहे.