शिक्षकाकडून विद्यार्थ्याला काठीने मारहाण
By Admin | Updated: March 20, 2016 01:07 IST2016-03-20T01:07:06+5:302016-03-20T01:07:06+5:30
वर्ग सुरू असताना मस्ती केल्यामुळे शिक्षकाने आठवीच्या विद्यार्थ्याला काठीने मारहाण केल्याची घटना शिरवणे येथील पालिका शाळेत घडली आहे. शनिवारी मुलाने शाळेत जायला

शिक्षकाकडून विद्यार्थ्याला काठीने मारहाण
नवी मुंबई : वर्ग सुरू असताना मस्ती केल्यामुळे शिक्षकाने आठवीच्या विद्यार्थ्याला काठीने मारहाण केल्याची घटना शिरवणे येथील पालिका शाळेत घडली आहे. शनिवारी मुलाने शाळेत जायला नकार दिल्याने हा प्रकार उघड झाला. याप्रकरणी शिक्षकाविरोधात नेरूळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
शिरवणे येथील महापालिका शाळा क्रमांक १४ मध्ये शुक्रवारी हा प्रकार घडला आहे. सदर शाळेत आठवीमध्ये शिकणाऱ्या एका मुलाला शाळेचे शिक्षक रवींद्र फाफळे यांनी अंगावर जखमा होईपर्यंत मारहाण केली. वर्ग सुरू असताना मस्ती केल्याचा राग आल्याने शिक्षकाने आपल्याला काठीने मारहाण केल्याचे त्या विद्यार्थ्याचे म्हणणे आहे. या प्रकारात त्याच्या हातावर व शरीरावर गंभीर जखमा देखील झाल्या आहेत. परंतु मस्ती करणाऱ्या दुसऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षा न करता केवळ आपल्यालाच सूडवृत्तीने मारहाण झाल्याचेही विद्यार्थ्याचे म्हणणे आहे. शुक्रवारी शाळेत झालेल्या या प्रकारामुळे भयभीत झालेल्या या विद्यार्थ्याने शनिवारी शाळेत जायला नकार दिला. यावेळी घरच्यांना त्याला झालेल्या मारहाणीची माहिती मिळाली.
नेरूळ पोलीस ठाण्यात सदर शिक्षकाविरोधात तक्रार करण्यात आली आहे. तसेच शिक्षण मंडळाने संपूर्ण प्रकाराची चौकशी करून शिक्षकावर कारवाईची मागणी विवेक सुतार यांनी केली आहे. (प्रतिनिधी)
सूडवृत्तीने मारहाण
या प्रकाराबाबत संताप व्यक्त करीत स्थानिक सामाजिक कार्यकर्ते विवेक सुतार यांनी विद्यार्थ्याच्या पालकांसह शिक्षकाची भेट घेऊन जाब विचारला. यावेळी समाधानकारक उत्तर न मिळाल्याने जाणीवपूर्वक विद्यार्थ्याला मारहाण झाल्याची शंका त्यांनी व्यक्त केली आहे. या प्रकारामुळे पालकवर्गातूनही संतापाचे वातावरण आहे.