नवी मुंबई : शाहबाज गाव येथील टँकरमाफियांचे पाणीचोरीचे अड्डे अखेर पालिकेने उद्ध्वस्त केले. त्या ठिकाणी मोरबेची जलवाहिनी फोडून पंपाद्वारे दररोज लाखो लिटर पाण्याची चोरी होत असल्याच्या तक्रारी येऊनही संबंधितांवर कारवाई होत नव्हती. अखेर टँकरमाफियांकडून होणाऱ्या पाणीचोरीच्या प्रकाराचा भांडाफोड ‘लोकमत’ने करताच प्रशासन खडबडून जागे झाले. शाहबाज गाव येथे रेल्वे पुलाखाली अनेक महिन्यांपासून मोरबेच्या जलवाहिनीतून पाण्याची चोरी सुरू होती. राजकीय वरदहस्त व पालिकेच्याच काही अधिकाऱ्यांच्या छुप्या संमतीने त्या ठिकाणी हा प्रकार सुरू होता. रेल्वेरूळ व रस्त्यालगतच ही पाणीचोरी सुरू असतानाही पालिका अधिकाऱ्यांची त्यावर नजर पडत नव्हती. तर काही दक्ष नागरिकांनी तक्रार केल्यास त्यांचीही दिशाभूल करून प्रकरण दडपण्याचे प्रकार सुरू होते. यामुळे त्या ठिकाणी होणाऱ्या पाणीचोरीमुळे पालिकेला कोट्यवधींचा फटका बसत होता. एकीकडे जमाखर्चाचा मेळ जुळवत पालिकेने उत्पन्नवाढीवर भर दिला आहे. त्यात शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी कोट्यवधींचा निधी खर्च होत आहे. मात्र बिलापोटी मिळणारी रक्कम फारच कमी असल्याने पाण्यावर होणाऱ्या जमाखर्चातली तफावत भरून काढणे पालिकेला गेल्या कित्येक वर्षांत जमलेला नाही. शहरातल्या १२ लाख लोकसंख्येसाठी एकूण ४२२ दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जात आहे. त्यात १९ टक्के होणारी गळती थांबवण्याचे पालिकेपुढे मोठे आव्हान आहे. परंतु अनेक प्रयत्न करूनही अधिकाऱ्यांना ही गळती थांबवण्यात यश आलेले नाही. गळतीचे हे प्रमाण लक्षात घेता लोकप्रतिनिधींनी देखील वारंवार याविषयी आवाज उठवलेला आहे. अशातच शहरात टँकरमाफियांकडून सुरू असलेल्या पाणीचोरीबाबतचे वृत्त ‘लोकमत’ने शनिवारच्या अंकात प्रसिद्ध केले होते. याची दखल घेत पालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने त्या ठिकाणी कारवाई करून सात डिझेल पंप जप्त केले. तसेच या कारवाईची माहिती पाणीपुरवठा विभागाला दिली. संपूर्ण राज्य दुष्काळाने होरपळत असतानाच उघड झालेल्या पाणीचोरीचा संताप सर्वसामान्य व्यक्त करीत आहेत.> पाणीचोरीच्या प्रकाराबाबात पालिकेचे कार्यकारी अभियंते अरविंद शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी वस्तुस्थिती नाकारली होती. त्या ठिकाणी कसलीही गळती नसून पाणीचोरी होत नसल्याचेही त्यांनी ठामपणे सांगितले होते. प्रत्यक्षात शनिवारी झालेल्या कारवाईत त्या ठिकाणची पाणीचोरी उघड झाली आहे. तर कारवाईदरम्यान विभाग अधिकारी धर्मेंद्र गायकवाड यांनीही दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. टँकरमध्ये भरले जाणारे पाणी मोरबेच्या जलवाहिनीचे नसून साचलेले सांडपाणी असल्याचे त्यांनी प्रसिद्धी माध्यमांना सांगितले.संपूर्ण कारवाईत त्यांना मोरबेच्या मुख्य जलवाहिनीला जोडलेला नळ दिसला नाही, याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे. तर कारवाईदरम्यान राजकीय व्यक्तींनी उपस्थित राहून त्यांचे टँकरमाफियांसोबतचे हितसंबंध उघड केले.
अबकारी कराच्या विरोधात सराफांची ‘चहाविक्री’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2016 02:50 IST