पनवेलमध्ये प्रथमच ‘टँकर’ धोरण

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2019 12:24 AM2019-01-21T00:24:07+5:302019-01-21T00:24:13+5:30

पनवेल शहरासाठी ग्रामीण भागात सध्या पाणीटंचाईची समस्या गंभीर आहे.

 'Tanker' policy for the first time in Panvel | पनवेलमध्ये प्रथमच ‘टँकर’ धोरण

पनवेलमध्ये प्रथमच ‘टँकर’ धोरण

Next

- वैभव गायकर

पनवेल : पनवेल शहरासाठी ग्रामीण भागात सध्या पाणीटंचाईची समस्या गंभीर आहे. पनवेल महापालिकेच्या मालकीच्या देहरंग धरणातील पाणीसाठा जानेवारी अखेरपर्यंत संपुष्टात येतो. अशावेळी पनवेल शहरातील पाणीपुरवठा टँकरवर अवलंबून असतो. मात्र टँकर चालकांकडून नागरिकांची लूट करण्यात येते. टँकरच्या दरामध्येही चढ-उतार केली जाते. यासंदर्भात पनवेल महापालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांनी ‘टँकर धोरण’ ठरविले आहे. पालिका क्षेत्रात पाणीपुरवठा करणाऱ्या खासगी तसेच पालिकेच्या ठेकेदार असलेल्या टँकर मालकांवर नियंत्रण राहील.
पनवेल महापालिका क्षेत्रात विविध संस्थांच्या मार्फत पाणीपुरवठा केला जातो. पनवेल शहर, मोठा खांदा, छोटा खांदा, पोदी विभागासह पालिकेत समाविष्ट २९ गावांत पाणीपुरवठ्याची जबाबदारी पालिकेची आहे. या व्यतिरिक्त खारघर, कळंबोली, नवीन पनवेल, कामोठे, तळोजा या नोडमध्ये सिडकोकडून पाणीपुरवठा केला जातो. सिडको, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण तसेच महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांच्यामार्फत हा पाणीपुरवठा केला जातो. उन्हाळ्यामध्ये पाण्याची कमतरता भासू लागल्यामुळे टँकर पुरविण्याचे कंत्राट देण्यात येते. मात्र त्यात सुसूत्रता नसल्याच्या तक्रारी नागरिकांकडून येतात.
पालिकेच्या कंत्राटदाराव्यतिरिक्त खासगी टँकरनेही पाणीपुरवठा होत असून आकारण्यात येणारे दर अव्वाच्या सव्वा असल्याचे पालिका प्रशासनानेही मान्य केले आहे. खासगी टँकर पाणी कुठून आणतात, त्याचा दर्जा काय, याची माहिती उपलब्ध नसल्याने नागरिकांच्या आरोग्याशी खेळ होऊ शकतो. याचा विचार करून पालिकेने टँकरसंदर्भात नवीन धोरण ठरविले आहे.
>असे असेल टँकर धोरण; पाणीवाटपात येणार सुसूत्रता
पालिकेतर्फेपुरविण्यात येणाºया टँकर्सवर ‘पनवेल महापालिका सेवार्थ’ असे ठळक लिहिणे बंधनकारक आहे. पालिकेमार्फत पुरविण्यात येणाºया टँकर्स चालकांकडून स्वत:चे पाण्याचे स्रोत, सिडको, एमआयसीडी, एमजेपी या खात्रीलायक स्रोतातूनच पुरवठा केला जाईल. लोकप्रतिनिधी यांच्यामार्फत टँकरची मागणी केली असल्यास त्याचे शुल्क आकारण्याची जबाबदारी देखील त्या प्रतिनिधींची राहील पालिकेने ठरवून दिलेल्या दरानुसारच खासगी टँकर
चालकांना पिण्याचे पाणी पालिका क्षेत्रात पुरवावे लागेल. खासगी टँकर चालकांनी पाण्याच्या स्रोताची माहिती महा-पालिकेला देणे बंधनकारक राहील. टँकर्सची मागणी लेखी स्वरूपात आल्यानंतरच पालिकेमार्फत टँकरने पाणीपुरवठा केला जाईल. परवानगीशिवाय पालिका क्षेत्रात पाणीपुरवठा करता येणार नाही. टँकरचे दर पालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केले जाणार आहेत.खासगी टँकर चालकांना पालिकेचा अधिकृत परवाना अनिवार्य राहील.पालिकेमार्फत पाणीपुरवठा होत नसल्यास टँकरचे शुल्क आकारले जाणार नाही.
>पाणीपुरवठ्यात पारदर्शकता आणण्यासाठी टँकर धोरण अमलात आणले आहे. टँकरद्वारे पाणीपुरवठ्याबाबत पालिकेला नागरिकांच्या अनेकदा तक्रारी आल्या असून त्याची दखल घेत हे धोरण आखण्यात आलेले आहे.
- गणेश देशमुख, आयुक्त,
पनवेल महानगर पालिका
>टँकर धोरणाची काटेकोरपणे अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. याव्यतिरिक्त पालिकेच्या हौदावर पालिकेचा जबाबदार अधिकारी व कर्मचारी पूर्णवेळ नियुक्त असावा. तसेच टँकरची नोंदणी संगणकीकृत केल्यास धोरणामध्ये आणखीन पारदर्शकता येईल.
- प्रीतम म्हात्रे, विरोधी पक्षनेते,
पनवेल महानगरपालिका
>पालिकेचे टँकरसंदर्भात धोरण निश्चितच चांगले आहे. या धोरणामुळे संपूर्ण पालिका क्षेत्रातील टँकर चालकांवर नियंत्रण येणार आहे. विशेष म्हणजे पालिकेच्या नावाखाली टँकर चालकांकडून सर्वसामान्यांची लूट होणार नाही. नागरिकांना या धोरणामुळे दिलासा मिळेल.
- प्रकाश बिनेदार, नगरसेवक, पनवेल महानगरपालिका

Web Title:  'Tanker' policy for the first time in Panvel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.