तळोजात पाणीपुरवठा, विजेचे दुहेरी संकट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2017 01:03 IST2017-07-31T01:03:33+5:302017-07-31T01:03:33+5:30
सिडकोने वसवलेल्या तळोजा नोडला समस्यांचे ग्रहणच लागले आहे. आंदोलन, धरणे, मोर्चे काढूनही समस्यांचे निराकरण होत नसल्याने रहिवासी त्रस्त आहेत.

तळोजात पाणीपुरवठा, विजेचे दुहेरी संकट
पनवेल : सिडकोने वसवलेल्या तळोजा नोडला समस्यांचे ग्रहणच लागले आहे. आंदोलन, धरणे, मोर्चे काढूनही समस्यांचे निराकरण होत नसल्याने रहिवासी त्रस्त आहेत. अपुरा व कमी दाबाने होणारा पाणीपुरवठा व वारंवार खंडित होणाºया विजेने नागरिक हैराण झाले आहेत. या ठिकाणी दिवसातून पाच ते सहा वेळा अघोषित लोडशेडिंग असल्याने स्थानिकांमध्ये महावितरणच्या कारभाराबाबत नाराजी आहे.
रविवारीदेखील सकाळपासूनच वारंवार वीजपुरवठा खंडित झाला होता. परिणामी, अनेक इमारतींमधील लिफ्ट बंद होत्या. वारंवार वीज खंडित होत असल्याने लिफ्टमध्ये मुले, महिला अडकून पडल्याचे प्रकार घडत आहेत. व्यापारी, दुकानदारांनाही खंडित विजेचा फटका बसतो आहे. तळोजात भविष्यात सिडकोकडून या ठिकाणी पुरवण्यात येणाºया सोयी-सुविधांच्या आमिषाला बळी पडून याठिकाणी घर घेतले. मात्र, आमची घोर निराशा झाल्याचे या ठिकाणी घर खरेदी करणारे रवि शिंदे यांनी सांगितले. अशीच परिस्थिती राहिली, तर स्थानिक रहिवासी मोठ्या संख्येने स्थलांतरित होण्याची भीती त्यांनी वर्तवली. आता पनवेल महापालिकेत तळोजा नोडचा समावेश करण्यात आल्याने आतातरी येथील समस्यांचे निराकरण होईल का, असा प्रश्न नागरिकांकडून विचारण्यात येत आहे.