शहरातील जलतरणपटूंचा गौरव
By Admin | Updated: May 23, 2016 03:22 IST2016-05-23T03:22:07+5:302016-05-23T03:22:07+5:30
धरमतर ते बेलापूर खाडी असे ५१ किमी अंतर अवघ्या १० तास ४५ मिनिटांत पार करणाऱ्या नवी मुंबईतील वेदांत सावंत आणि राज पाटील या दोनही चिमुकल्या जलतरणपटूंचा गौरव करण्यात आला

शहरातील जलतरणपटूंचा गौरव
नवी मुंबई : धरमतर ते बेलापूर खाडी असे ५१ किमी अंतर अवघ्या १० तास ४५ मिनिटांत पार करणाऱ्या नवी मुंबईतील वेदांत सावंत आणि राज पाटील या दोनही चिमुकल्या जलतरणपटूंचा गौरव करण्यात आला. गुरुवारी मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी दोघांच्याही जिद्दीला दाद देत त्यांचे कौतुक केले.
एवढ्या कमी वयात सागरी प्रवास करणाऱ्या या चिमुकल्यांचे खरोखरच कौतुक वाटते अशी प्रतिक्रिया उध्दव ठाकरे यांनी व्यक्त केली. यापुढेही जिद्दीच्या बळावर आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत मजल गाठण्याकरिताही यावेळी शुभेच्छा दिल्या. नऊ वर्षीय वेदान्त विश्वनाथ सावंत आणि दहा वर्षीय राज पाटील यांनी रविवारी साखळी पद्धतीने पोहून अलिबाग येथील धरमतर जेट्टी ते बेलापूर जेट्टी हा जलप्रवास करून विक्रम नोंदविला. धरमतर ते बेलापूर रेतीबंदर हे ५१ किमीचे सागरी अंतर पार करणारे लहान वयोगटात देशातील पहिले जलतरणपटू ठरल्याने सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. साखळी पद्धतीने पोहून चिमुकल्यांचा हा जलप्रवास थक्क करणारा होता. आंतरराष्ट्रीय पातळीवरील जलतरण प्रशिक्षक संतोष पाटील तसेच प्रशिक्षक संकेत सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली दोघेही जलतरणाचा सराव करतात.