स्वामी विवेकानंदांची विज्ञान निष्ठा दिशादर्शक
By Admin | Updated: January 13, 2017 06:05 IST2017-01-13T06:05:46+5:302017-01-13T06:05:46+5:30
स्वामी विवेकानंद यांचे व्यक्तिमत्व आणि विशेषत: त्यांची विज्ञान निष्ठा ही आयुष्यास खऱ्या अर्थाने दिशा

स्वामी विवेकानंदांची विज्ञान निष्ठा दिशादर्शक
अलिबाग : स्वामी विवेकानंद यांचे व्यक्तिमत्व आणि विशेषत: त्यांची विज्ञान निष्ठा ही आयुष्यास खऱ्या अर्थाने दिशा देणारी अशीच आहे. माझ्या आयुष्यात महर्षी न्यायरत्न विनोद आणि बाळासाहेब ठाकरे हे दोन आदर्श असून, त्यांनीच माझे आयुष्य घडविले, असे प्रतिपादन राज्याचे परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी गुरुवारी येथे केले आहे.
स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त अलिबाग तालुक्यातील केतकीचा मळा येथील महर्षी विनोद सिद्धाश्रम सेवा मंडळ आणि गणराज युवक मंडळ अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने येथील अॅड. दत्ता पाटील कॉलेज आॅफ लॉच्या सभागृहात आयोजित सतराव्या महर्षी न्यायरत्न विनोद वक्तृत्व स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी रावते बोलत होते.
रावते म्हणाले की, परिवहन खात्यामध्ये आमूलाग्र बदल घडवण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्याचाच एक भाग म्हणून कॉलेज कॅम्पसमध्ये तरुणांना ड्रायव्हिंग लायसन्स मिळवून देण्याच्या योजनेचा शुभारंभ लवकरच करण्यात येणार आहे. उद्घाटन समारंभानंतर सुरू झालेल्या स्पर्धेत विज्ञान आणि स्वामी विवेकानंद, स्वधर्मे निधनं श्रेय: परधर्मो भयावह:, बदलत्या अर्थव्यवस्थेचे सामाजिक परिणाम, भाषा मरता, देशही मरतो, पर्यावरण संरक्षण हीच खरी नैतिकता, या विषयांवर स्पर्धकांनी आपले अभ्यासपूर्ण विचार मांडले. स्पर्धेचे परीक्षक म्हणून माणगाव माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक माधव कुंटे व पनवेल येथील अॅड. प्रथमेश सोमण यांनी काम पाहिले. या वेळी अॅड. श्रीराम ठोसर व अॅड. अदिती वैद्य आदी उपस्थित होते. (विशेष प्रतिनिधी)