कारवाई टाळल्याने पोलिसाचे निलंबन
By Admin | Updated: November 2, 2015 01:49 IST2015-11-02T01:49:48+5:302015-11-02T01:49:48+5:30
गुटखा बाळगल्याप्रकरणी पकडलेल्या टपरीचालकावर कारवाई टाळत सहकाऱ्यांनाच झापणाऱ्या पोलिसाला निलंबित व्हावे लागले आहे

कारवाई टाळल्याने पोलिसाचे निलंबन
नवी मुंबई : गुटखा बाळगल्याप्रकरणी पकडलेल्या टपरीचालकावर कारवाई टाळत सहकाऱ्यांनाच झापणाऱ्या पोलिसाला निलंबित व्हावे लागले आहे. कामोठे पोलीस ठाण्यातला हा प्रकार असून परिमंडळ उपायुक्तांनी चौकशीअंती त्या पोलिसाला निलंबित केले आहे.
संपत्ती येळकर असे निलंबित झालेल्या झालेल्या पोलिसाचे नाव असून, तो कामोठे पोलीस ठाण्यात पोलीस नाईक पदावर कार्यरत होता. कामोठे पोलीस ठाण्यापासून काही अंतरावरच असलेल्या पाणाच्या टपरीवर बंदी असतानाही गुटखा विक्री होत असल्याची माहिती बिट मार्शल पोलिसांना वायरलेसवर मिळाली होती. यानुसार दोघे जण त्या ठिकाणी गेले असता त्यांना १०० रुपयांचा गुटखा आढळून आला. यामुळे जप्त केलेल्या गुटख्यासह टपरीचालक श्यामसुंदर पांडे याला पकडून ते दोघे जण पोलीस ठाण्यात आले होते. मात्र यावेळी येळकर याने दोघा बिट मार्शलना झापत पांडेवर कारवाई न करता सोडून दिले होते. त्यामुळे झालेल्या प्रकाराची माहिती दोघा बिट मार्शल पोलिसांनी वरिष्ठांना दिली होती. यावरून येळकर याची चौकशी लागली असता त्यामध्ये तो दोषी आढळला. यामुळे त्याचे निलंबन केल्याचे परिमंडळ २ चे उपायुक्त विश्वास पांढरे यांनी सांगितले. पकडलेल्या गुटख्यावर कारवाईला टाळाटाळ तसेच शिस्तभंगाचा ठपका ठेवून त्याच्यावर कारवाई केली आहे.