वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निवृत्ती वयवाढीला स्थगिती
By Admin | Updated: February 23, 2017 06:38 IST2017-02-23T06:38:28+5:302017-02-23T06:38:28+5:30
महापालिकेच्या आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांच्या निवृत्तीचे वयवाढीचा प्रस्ताव बुधवारी

वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निवृत्ती वयवाढीला स्थगिती
नवी मुंबई : महापालिकेच्या आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांच्या निवृत्तीचे वयवाढीचा प्रस्ताव बुधवारी झालेल्या महासभेने फेटाळला. केवळ एकाच विभागातील अधिकाऱ्यांऐवजी सर्वच अधिकाऱ्यांच्या निवृत्ती वयवाढीचा प्रस्ताव सभागृहापुढे मांडण्याच्या सूचना यावेळी सभागृहाने प्रशासनाला केल्या. परंतु शासनाचा निर्णय केवळ आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांसाठीच असल्याचे यावेळी प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.
बुधवारी झालेल्या महासभेत पालिकेच्या आरोग्य विभागातील अधिकारी व डॉक्टर यांच्या निवृत्तीचे वयवाढीचा प्रस्ताव सभागृहापुढे आला होता. परंतु केवळ आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांच्या बाबतीतच हा निर्णय का असा प्रश्न उपस्थित करत पालिकेच्या सर्वच अधिकाऱ्यांचा त्यात समावेश का नाही असा प्रश्न नगरसेवक संजू वाडे व अनंत सुतार यांनी उपस्थित केला. यावेळी डॉक्टर उपलब्ध होत नसल्याने शासनानेच आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांच्या निवृत्तीचे वयवाढीचा निर्णय घेतला असल्याचे पीठासीन अधिकारी अंकुश चव्हाण यांनी सांगितले.
यावेळी मागील काही महिन्यात झालेल्या मुलाखतीअंती किती डॉक्टर रु जू झाले यासंबंधी महापौर सुधाकर सोनावणे यांनी प्रशासनाकडे चौकशी केली असता, ६५ पैकी केवळ २६ डॉक्टर कामावर हजर झाल्याची माहिती समोर आली. यावरून महापौर सुधाकर सोनावणे यांनी प्रशासनावर ताशेरे ओढले. उपलब्ध डॉक्टरांना समाधानकारक वेतन देण्याऐवजी तुटपुंजे मानधन दिले तर कोण काम करेल , असा टोलाही त्यांनी मारला. तर रु ग्णालये सज्ज असतानाही डॉक्टर नसणे ही प्रशासनावर नामुष्की आलेली असल्याचेही ते म्हणाले. परंतु रोस्टर मंजूर नसल्याने आरोग्य व अग्निशमन दलातील कायमस्वरूपी भरती करता येत नसल्याचे चव्हाण यांनी सांगितले. मात्र प्रशासनाच्या स्पष्टीकरणावर देखील असमाधान व्यक्त करत महापौरांनी सार्वमताने हा प्रस्ताव फेटाळला. (प्रतिनिधी )