हवालदाराची लोकलमध्ये आत्महत्या
By Admin | Updated: August 8, 2016 05:55 IST2016-08-08T05:54:52+5:302016-08-08T05:55:45+5:30
बोरीवलीहून चर्चगेटला येणाऱ्या धीम्या लोकलमध्ये गस्तीवर असणाऱ्या अमर महादेव गायकवाड (४३) या पोलीस हवालदाराने (जीआरपी) रायफलने छातीत गोळी घालून घेत

हवालदाराची लोकलमध्ये आत्महत्या
मुंबई : बोरीवलीहून चर्चगेटला येणाऱ्या धीम्या लोकलमध्ये गस्तीवर असणाऱ्या अमर महादेव गायकवाड (४३) या पोलीस हवालदाराने (जीआरपी) रायफलने छातीत गोळी घालून घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना रविवारी पहाटे घडली. आत्महत्येमागचे कारण समजू शकले नाही.
घाटकोपर रेल्वे पोलीस वसाहतीत राहणारे अमर गायकवाड हे मुंबई सेन्ट्रल रेल्वे पोलीस स्टेशनमध्ये (जीआरपी) कार्यरत होते. सध्या गायकवाड हे लोकलमध्ये गस्तीवर होते. रविवारी पहाटे ४.०३ वाजता त्यांनी बोरीवलीहून चर्चगेटला जाणारी धीमी लोकल पकडली. महिलांच्या डब्यात सुरक्षेसाठी नेमणूक असलेले गायकवाड हे त्यानंतरच्या लोकलमध्ये तैनात होते. पण ती लोकल न पकडता त्याआधीच त्यांनी ४.०३ ही लोकल पकडून दुसऱ्या सेकंड क्लास डब्यातून प्रवास सुरू केला. लोकल पहाटे ५.२९ च्या सुमारास मालाड ते गोरेगावच्या दरम्यान आली असता त्यांंनी आपल्याजवळील बंदुकीतून छातीत गोळी झाडून घेतली.
एका खासगी कंपनीतील सुरक्षा रक्षकाने ही घटना पाहिली आणि गोरेगाव येथे उतरल्यानंतर तात्काळ रेल्वे पोलिसांना त्याची माहिती दिली. तोपर्यंत लोकल पुढे निघून गेल्याने स्थानकातील पोलिसांनी त्याची माहिती पुढील स्थानकांना दिली. अखेर चर्चगेट येथे लोकल आल्यानंतर रेल्वे पोलिसांना गायकवाड हे डब्यात रक्तबंबाळ पडलेले दिसले. त्यांना लोकलमधून उतरवून त्वरित उपचारासाठी जीटी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.