पुरवठा विभागाची सत्त्वपरीक्षा
By Admin | Updated: December 12, 2015 01:47 IST2015-12-12T01:47:52+5:302015-12-12T01:47:52+5:30
रायगड जिल्ह्यातील २६ लाख लोकसंख्येपैकी नऊ लाख लोकसंख्येचा आधार क्रमांक शिधापत्रिकांना सिडिंग करण्याचे काम अद्याप बाकी आहे. मुदतवाढ देत ३१ डिसेंबर २०१५ ही सरकारने डेडलाइन दिली आहे

पुरवठा विभागाची सत्त्वपरीक्षा
आविष्कार देसाई, अलिबाग
रायगड जिल्ह्यातील २६ लाख लोकसंख्येपैकी नऊ लाख लोकसंख्येचा आधार क्रमांक शिधापत्रिकांना सिडिंग करण्याचे काम अद्याप बाकी आहे. मुदतवाढ देत ३१ डिसेंबर २०१५ ही सरकारने डेडलाइन दिली आहे. त्यामुळे एवढ्या कमी कालावधीमध्ये काम पूर्ण करणे जिल्हा पुरवठा विभागाची सत्त्वपरीक्षा घेणारे ठरणार आहे.
सरकारने सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत शिधावस्तूंचे वितरण बायोमेट्रिक पध्दतीने करण्याचे ठरविले आहे. रेशनकार्ड आधार क्रमांकासोबत सिडिंग करणे आवश्यक आहे. यासाठी छापील फॉर्ममध्ये कुटुंबातील सर्व व्यक्तींची माहिती, त्यांचा आधार क्रमांक, बँक पास बुक क्रमांक, मोबाइल क्रमांक, कुटुंबातील ज्येष्ठ महिला सदस्याचा फोटो अशी अद्ययावत माहिती द्यावयाची आहे. सर्व फॉर्म रेशनिंग दुकानदार यांच्याकडे जमा करायचे आहेत. मुदतीत दिले नाही, तर शिधापत्रिका रद्द होऊ शकते. शिधापत्रिकाधारकांना बायोमॅट्रिक पध्दतीचे कार्ड देण्याचे सरकारच्या विचाराधीन आहे.
नागरिकांना याची माहिती व्हावी यासाठी विविध बैठका, बॅनर, पोस्टर्स लावून जनजागृती करण्यात येत आहे. मात्र पाहिजे त्या प्रमाणात प्रतिसाद मिळत नसल्याने काम रखडले आहे. फॉर्म भरुन देण्यासाठी या आधी दोन वेळा मुदतवाढ देण्यात आली होती. आता सरकारने ३१ डिसेंबर २०१५ ही अंतिम डेडलाइन दिली आहे.
रायगड जिल्ह्याची लोकसंख्या सुमारे २६ लाख आहे. त्यापैकी प्राधान्य गटातील आणि अंत्योदय योजनेतील असे एकूण सुमारे २२ लाख लोकसंख्येपैकी ९ लाख लोकसंख्येचे आधार क्रमांक सिडिंगचे काम बाकी आहे. आतापर्यंत सुमारे ७६ टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित सिडिंगचे काम ३१डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्यावर भर देण्यात येत असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी एस.एम. दुफारे यांनी लोकमतशी बोलताना दिली. प्रगती झेरॉक्स यांना हे काम देण्यात आल्याचे दुफारे यांनी सांगितले.
>> १३१० रेशनिंग दुकाने
१५ तालुक्यातील रेशनिंग दुकानांची संख्या एक हजार ३१० आहे. केशरी रंगाचे शिधापत्रिकाधारक दोन लाख १० हजार, पिवळे शिधापत्रिकाधारक (अंत्योदय) ८१ हजार, दारिद्र्य रेषेखालील ७९ हजार, आणि शुभ्र शिधापत्रिकाधारकांची संख्या एक लाख १० हजार आहे.