खाडीपुलावरून उडी मारून आत्महत्या; अग्निशमन दलाने महिलेला पाण्याबाहेर काढले
By सूर्यकांत वाघमारे | Updated: November 13, 2023 19:11 IST2023-11-13T19:11:41+5:302023-11-13T19:11:59+5:30
वाशी खाडीपुलावरून उडी मारून महिलेने आत्महत्या केल्याची घटना रविवारी रात्री घडली.

खाडीपुलावरून उडी मारून आत्महत्या; अग्निशमन दलाने महिलेला पाण्याबाहेर काढले
नवी मुंबई : वाशी खाडीपुलावरून उडी मारून महिलेने आत्महत्या केल्याची घटना रविवारी रात्री घडली. घटनेची माहिती मिळताच वाशी अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेऊन महिलेला पाण्याबाहेर काढले. मात्र रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
रविवारी रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास वाशी खाडीपुलावर हि घटना घडली. खाडीपुलावरून एका महिलेने पाण्यात उडी मारल्याची तक्रार वाशी पोलिसांकडे आली होती. त्यानुसार वाशी अग्निशमन दलाला कळवण्यात आले असता बोटीच्या साहाय्याने पुलाखाली शोध घेण्यात आला.
यावेळी बुडत असलेल्या महिलेला बाहेर काढून रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यापूर्वीच सदर महिलेचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. सुमारे ४५ ते ५० वर्षाची हि महिला असून तिची ओळख पटलेली नसल्याचे वाशी पोलिसांनी सांगितले. तिची ओळख पटवण्यासाठी नवी मुंबईसह लगतच्या शहरातून बेपत्ता महिलांची माहिती मिळवली जात आहे.