विवाहितेचा मुलीसह आत्महत्येचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2018 23:28 IST2018-10-23T23:28:44+5:302018-10-23T23:28:46+5:30
दिघा येथील तलावात उडी मारून विवाहितेने चार महिन्यांच्या मुलीसह आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना घडली.

विवाहितेचा मुलीसह आत्महत्येचा प्रयत्न
नवी मुंबई : दिघा येथील तलावात उडी मारून विवाहितेने चार महिन्यांच्या मुलीसह आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना घडली. या वेळी काही प्रत्यक्षदर्शींनी तिला आत्महत्या करण्यापासून वाचवून पोलिसांच्या ताब्यात दिले. दुसरीही मुलगी झाल्याने सासरच्यांकडून छळ होत असल्याच्या कारणावरून तिने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे महिलेचे म्हणणे आहे.
सोमवारी दुपारच्या सुमारास दिघा विभाग कार्यालयासमोरील तलावाच्या ठिकाणी हा प्रकार घडला. त्याठिकाणी एक महिला चार महिन्यांच्या मुलीसह तलावात उडी मारण्याच्या प्रयत्नात होती. या वेळी तिथे उपस्थित काही दक्ष नागरिकांनी तिला तलावात उडी मारण्यापासून अडवून मानसिक आधार दिला. या वेळी नगरसेवक नवीन गवते यांनीही घटनास्थळाकडे धाव घेवून सदर विवाहितेला धीर देत घडलेल्या घटनेची पोलिसांना माहिती दिली. चौकशीत ती दिघा परिसरात राहणारी असल्याचे समोर आले. शिवाय दुसऱ्यांदा मुलगी झाल्याने सासरच्यांकडून छळ सुरू होता असे सांगितले. या त्रासाला कंटाळून तिने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. मात्र, याप्रकरणी गुन्हा दाखल नसल्याचे रबाळे पोलिसांनी सांगितले.