साखरचौथ गणरायाचे आगमन
By Admin | Updated: October 1, 2015 23:48 IST2015-10-01T23:48:21+5:302015-10-01T23:48:21+5:30
भाद्रपद चतुर्थीला आगमन झालेल्या बाप्पांनी दहा दिवसांचा पाहुणचार घेवून अनंत चतुर्दशीला विसर्जन केले होते. त्यानंतर आलेली संकष्ट चतुर्थी अर्थात साखरचौथीला पुन्हा भक्तांच्या आग्रहाखातर

साखरचौथ गणरायाचे आगमन
पेण : भाद्रपद चतुर्थीला आगमन झालेल्या बाप्पांनी दहा दिवसांचा पाहुणचार घेवून अनंत चतुर्दशीला विसर्जन केले होते. त्यानंतर आलेली संकष्ट चतुर्थी अर्थात साखरचौथीला पुन्हा भक्तांच्या आग्रहाखातर बाप्पा दीड दिवसाच्या अल्प कालखंडासाठी इच्छादर्शन व मनोकामना पूर्ण करण्यासाठी आमंत्रण स्वीकारुन विराजमान झाले आहेत. गेले दशकभर या उत्सवाची लोकप्रियता वाढत असून पेणमध्ये शहर व ग्रामीण विभागात ८०० ते ८५० च्या घरात श्रींच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली आहे.
या उत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे बाप्पाच्या मोहक मूर्ती व केलेली आरास पाहण्यासाठी मोठी गर्दी उसळते. गुरु वारी रात्री सार्वजनिक मंडळाचे विविध सांस्कृतिक व धार्मिक उपक्रमांमुळे भक्तगण रात्रभर श्रीगणेशाच्या दर्शनासाठी रांगा लावतात. साखरचौथ गणरायांच्या उत्सवासाठी पेणच्या मूर्तिकारांना आपल्या कलाकुसरीची झलक दाखविण्याची अपूर्व संधी मिळते. पेणच्या गणेशमूर्तिकारांना साखरचौथ उत्सवानिमित्ताने कलाप्रदर्शनाचा अपूर्व योग जुळून येतो.
पेणमधील कासार आळी गणेशमूर्तिकारांची गल्ली. या गल्लीत गणेशमूर्तिकारांची नवी पिढी सध्या या व्यवसायात नावलौकिक मिळवित आहे. येथील महाकाली मित्र मंडळाची गणेशमूर्ती या यंग जनरेशनमधील विजय गोडे, अनिकेत समेळ, मृगज कुंभार यांनी रंगसंगतीने साकारली असून गतवर्षी सुंदर मूर्तीच प्रथम क्रमांक पटकविणाऱ्या या साखरचौथ मंडळाने यंदाही गणराज अॅवॉर्डसाठी अशीच सुंदर मूर्ती साकारली आहे.
पेणमधील सार्वजनिक उत्सवामध्ये अष्टविनायक मित्रमंडळ, ओरिजन अष्टविनायक मित्रमंडळ, श्री दत्त मित्रमंडळ, प्रेमनगर मित्रमंडळ, विठ्ठल आळी मित्रमंडळ, कोळीवाडा मित्रमंडळ, समृद्धी रेस्टॉरंट यांच्यासह पेण फणस डोंगरी, पेण रामवाडी या शहरातील सार्वजनिक व घरगुती गणरायांसह जोहे-हमरापूर कलाग्राम परिसरात गणरायांची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली आहे. (वार्ताहर)