साखर-मसाले ६५ टक्के, तर अन्नधान्याची आवक ५५ टक्क्यांनी मंदावली; वाहतूकदारांचे देशव्यापी आंदोलन  

By नारायण जाधव | Published: January 2, 2024 07:17 PM2024-01-02T19:17:43+5:302024-01-02T19:17:52+5:30

वाहतूकदार मंगळवारीही हिसंक होऊ नयेत यासाठी नवी मुंबईसह उरण-पनवेल परिसरात पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता.

Sugar-spices declined by 65 percent, while food grains declined by 55 percent Nationwide movement of transporters | साखर-मसाले ६५ टक्के, तर अन्नधान्याची आवक ५५ टक्क्यांनी मंदावली; वाहतूकदारांचे देशव्यापी आंदोलन  

साखर-मसाले ६५ टक्के, तर अन्नधान्याची आवक ५५ टक्क्यांनी मंदावली; वाहतूकदारांचे देशव्यापी आंदोलन  

नवी मुंबई: भारतीय न्यायिक संहितेतील हिट ॲण्ड रन प्रकरणात शिक्षेच्या तरतुदीविरोधात देशभरातील वाहनचालकांनी पुकारलेल्या आंदोलनाच्या मंगळवारी दुसऱ्या दिवशी येथील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजीपाल्याच्या आवक-जावकवर फारसा परिणाम झाला नसला तरी अन्नधान्य आणि परराज्यातून येणारी आवक रोडावली आहे. मात्र, आवक थोडी कमी झाली तरी ग्राहकच कमी आल्याने भाजीपाल्याचे दर स्थिर होते. मात्र, हे आंदोलनच असे सुरू राहिल्यास येत्या-एक दोन दिवसांत अन्नधान्यासह भाजीपाल्याची आवक कमी होऊन दर वाढू शकतात, अशी भीती व्यापाऱ्यांनी व्यक्त केली.
 
मंगळवारी भाजीपाल्याची आवक १० टक्क्यांनी, फळांची २५ टक्के, कांदा-बटाटा २० टक्के तर अन्नधान्याची ५५ टक्के आणि साखर-मसाल्याची ६५ टक्के आवक कमी झाली आहे.
 
एनएमएमटीचे वेळापत्रक कोलमडले
वाहतूकदारांच्या आंदाेलनामुळे पेट्रोल-डिझेलसह गॅसची वाहतूक मंदावल्याने त्याचा फटका मंगळवारी एनएमएमटी अर्थात नवी मुंंबई महापालिकेच्या परिवहन सेवेला बसला. यामुळे परिवहन सेवेचे वेळापत्रक काहीसे कोलमडल्याचे एनएमएमटीने सोशल मीडियाद्वारे जाहीर केले आहे.
 
महामार्गांवर पोलिसांचा बंदोबस्त
सोमवारप्रमाणेच वाहतूकदार मंगळवारीही हिसंक होऊ नयेत यासाठी नवी मुंबईसह उरण-पनवेल परिसरात पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. शहरातून जाणारे सायन-पनवेल, ठाणे-बेलापूर, मुंबई-पुणे, जेएनपीटी ते पनवेल, मुंबई-गोवा आणि एक्स्प्रेस वे या सर्व महामार्गांवर पोलिस बंदोबस्तावर होते. अनेक ठिकाणी वाहतूकदारांनी आपली वाहने रस्त्याच्या कडेला उभी केलेली दिसली. महामार्गांवर अवजड वाहने कमी असल्याने नेहमीसारखी त्यांची वर्दळ नव्हती.
 
आंदोलनापूर्वी आणि आंदोलनानंतरची आवक-आवक

  • मार्केट- आंदोलनापूर्वी - आंदोलनानंतर
  • कांदा-बटाटा-१६३- १३१
  • फळ - ३०२-२२८
  • भाजीपाला -५६३-५१६
  • साखर-मसाला-१६७-५९
  • अन्नधान्य -१४०-६४
  • एकूण - १३३५-९९८

Web Title: Sugar-spices declined by 65 percent, while food grains declined by 55 percent Nationwide movement of transporters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.