‘सागर कवच’ अभियान ठरले यशस्वी
By Admin | Updated: May 1, 2016 02:39 IST2016-05-01T02:39:02+5:302016-05-01T02:39:02+5:30
पोलीस आयुक्त प्रभात रंजन यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच विशेख शाखेच्या नेतृत्वाखाली बुधवार आणि गुरुवार अशा दोन दिवस सागरी कवच अभियान राबविण्यात आले होते.

‘सागर कवच’ अभियान ठरले यशस्वी
नवी मुंबई : पोलीस आयुक्त प्रभात रंजन यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच विशेख शाखेच्या नेतृत्वाखाली बुधवार आणि गुरुवार अशा दोन दिवस सागरी कवच अभियान राबविण्यात आले होते. यंत्रणांमधील सुसंवाद , सावधानता तसेच सज्जता अशा तीन महत्त्वाच्या बाबींवर आधारीत या आॅपरेशनमध्ये नौदल, कोस्ट गार्ड, मेरीटाईम बोर्ड, मरीन पोलीस, राज्य पोलीस, जेएनपीटी, मुंबई पोर्ट ट्रस्ट यांचा सहभाग होता.
पोलीस आयुक्तालयाकडून सागरी हद्दीत गस्त करण्याकरिता चार स्पीड बोट, सागरी सुरक्षा शाखेचे १६ अधिकारी, ५६ कर्मचारी, ३ कंत्राटी कर्मचारी तसेच पोलीस ठाणे स्तरावर ११६ अधिकारी, ५२६ कर्मचारी या अभियानात सहभागी झाले होते. शहरातील सागरी हद्दीतील आणि किना-यावरील अतिमहत्त्वाचे ठिकाणे, लँडींग पॉईंट, जेट्टी, चेकपोस्ट यापरिसरात प्रभावी गस्त करून उपयुक्त कामगिरी करून रेड फोर्सच्या जवानांना नवी मुंबई हद्दीत प्रवेश करण्यास दोनवेळा प्रतिबंध केला. नवी मुंबई पोलीसांनी सतर्क राहून हल्ले परतवून लावले. या अभियानामुळे नवी मुंबई पोलीसांची उत्कृष्ट कामगिरी तसेच सतर्कता पहायला मिळाली. या अभियानात सागर रक्षक दलाचे ४११ सदस्य, ग्राम रक्षक दलाचे ८२३ सदस्य आणि २२०१ पोलीस मित्रांनी देखील सहभाग घेतला होता. या अभियाना दरम्यान वाशी खाडी पुल येथे संशयीत बोट दिसून आल्याचे सागर रक्षक दलाचे सदस्य दत्तू भोईर यांनी पोलीसांना कळविल्याने ती बोट पोलीसांच्या ताब्यात दिली.