पनवेल-सायन महामार्गावरील सबवे पाण्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2017 03:01 IST2017-08-01T03:01:07+5:302017-08-01T03:01:07+5:30
पनवेल-सायन महामार्गावर कामोठे वसाहतीलगत बांधण्यात आलेले सबवे पाण्यात गेले आहेत. त्यामुळे कळंबोली, कामोठेकरांना जीव मुठीत धरून महामार्ग ओलांडावा लागत आहे.

पनवेल-सायन महामार्गावरील सबवे पाण्यात
कळंबोली : पनवेल-सायन महामार्गावर कामोठे वसाहतीलगत बांधण्यात आलेले सबवे पाण्यात गेले आहेत. त्यामुळे कळंबोली, कामोठेकरांना जीव मुठीत धरून महामार्ग ओलांडावा लागत आहे. कोपरा आणि कामोठे येथे टोलवसुली सुरू होऊन दोन वर्षे झाली तरी हे सबवे अद्याप सुरू झालेले नाहीत. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये नाराजी आहे.
पनवेल-सायन महामार्गाचे रुंदीकरण करण्यात आले आहे. बी.ओ.टी. तत्त्वावर सायन- पनवेल टोलवेज कंपनीला हे काम देण्यात आले होते. त्यानुसार २३ कि.मी. लांबीचे काँक्रीटीकरण करण्यात आले. परंतु बहुतांशी काम बाकी असताना शासनाने कंपनीला टोल वसुली करण्यास परवानगी दिली. कळंबोली, कामोठे, पुरुषार्थ पेट्रोलपंप येथे बांधण्यात आलेले तीन सबवे अद्याप सुरू करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे महामार्ग ओलांडताना प्रवाशांना मोठी कसरत करावी लागते. टोल सुरू झाल्यानंतर एक वर्षानंतर भुयारी मार्गाचे काम हाती घेण्यात आले. आता हे मार्ग बांधून पूर्ण झाले असले तरी आत पाणी साचले आहे. त्यामुळे प्रवाशांकरिता हे भुयारी मार्ग खुले करण्यात आलेले नाही. वसाहतीतील नागरिकांना महामार्ग ओलांडावा लागत असल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे, तरी सुद्धा सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग आलेली नाही. तर दुसरीकडे सायन-पनवेल टोलवेज कंपनी नुकसानभरपाई दिली नाही म्हणून शासनाच्या नावाने खडे फोडीत आहे. तीनही ठिकाणी बांधण्यात आलेले स्वच्छतागृह मध्यंतरी बंद होते. महामार्गालगत सर्व्हिस रोड तयार झालेला नाही. कामोठे वसाहतीतून आजही मुंबईकडे जाता येत नाही. त्यासाठी दोन कि.मी.चा वळसा घालावा लागतो. त्यात सबवे केवळ शोभेसाठीच आहेत. याबाबत वारंवार पाठपुरावा करूनही कार्यवाही होत नसल्याचे पनवेल-सायन महामार्ग प्रवासी कृती समितीचे अमोल शितोळे यांनी सांगितले. याबाबत बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता एस. पी. श्रावगे यांच्याशी संपर्क साधला प्रतिक्रि या मिळाली नाही.