ठेकेदारावर गुन्हा दाखल करा
By Admin | Updated: July 19, 2014 01:04 IST2014-07-19T01:04:40+5:302014-07-19T01:04:40+5:30
महामार्ग रूंदीकरण करणाऱ्या ठेकेदाराने केलेल्या चुकांमुळे सानपाडामध्ये नाल्यातील पाणी रस्त्यावर आले.

ठेकेदारावर गुन्हा दाखल करा
नामदेव मोरे, नवी मुंबई
महामार्ग रूंदीकरण करणाऱ्या ठेकेदाराने केलेल्या चुकांमुळे सानपाडामध्ये नाल्यातील पाणी रस्त्यावर आले. या प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा असे पत्र महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी तुर्भे व नेरूळ पोलिस स्टेशनला दिले आहे.
नवी मुंबईमध्ये १५ जुलैला सायंकाळपासून मुसळधार
पाऊस सुरू झाला होता. यावेळी औद्योगिक वसाहतीमधून येणाऱ्या नाल्याचे पाणी हर्डीलीया कंपनीजवळ रस्त्यावर आले होते. यामुळे सायन - पनवेल महामार्गावर मोठ्याप्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. रात्री २ वाजेपर्यंत चक्काजाम झाले होते.
याठिकाणी महामार्ग रूंदीकरण करणाऱ्या ठेकेदाराने नाल्याचे पाणी वाहून जाण्यासाठी कल्वर्ट तयार केले. परंतू शेवटच्या
लेनच्या खाली कल्वर्ट ऐवजी पाईप टाकले होते. पाईपमध्ये गाळ साचल्याने सर्व पाणी रस्त्यावर आले. येथील लक्ष्मीवाडी झोपडपट्टीमध्ये पाणी शिरले, हर्डीलीया कंपनीची भिंत कोसळली. अखेर ठेकेदार व महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी रस्त्याची एक
लेन जेसीबीने तोडली. पाईप बाहेर काढून नाल्यास मोकळी वाट करून दिली. ठेकेदाराने केलेल्या चुकांमुळे हा प्रकार घडल्याचा अभिप्राय पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिला आहे.