विद्यार्थ्यांनी बनवलेली ‘सोलर कार’
By Admin | Updated: March 3, 2016 02:52 IST2016-03-03T02:52:02+5:302016-03-03T02:52:02+5:30
अंजुमन-ए-इस्लाम टेक्निकल कॅम्पसच्या काळसेकर कॉलेजमधील अभियांत्रिकी शाखेतील विद्यार्थ्यांनी सौरऊर्जेवर चालणारी कार बनवली आहे.

विद्यार्थ्यांनी बनवलेली ‘सोलर कार’
वैभव गायकर, पनवेल
अंजुमन-ए-इस्लाम टेक्निकल कॅम्पसच्या काळसेकर कॉलेजमधील अभियांत्रिकी शाखेतील विद्यार्थ्यांनी सौरऊर्जेवर चालणारी कार बनवली आहे. इलेक्ट्रिकल सोलर व्हेइकल कॉम्पिटिशनच्या वतीने आयोजित आशिया स्तरावरील भारत, बांगलादेश आणि श्रीलंकेतील अभियांत्रिकी क्षेत्रातील १०१ महाविद्यालयांच्या प्रकल्पांची स्पर्धा यामध्ये रंगली होती. यात काळसेकर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी निर्माण केलेल्या सौरऊर्जेवर चालणाऱ्या कारने पहिल्या तीन फेऱ्या जिंकत अंतिम फेरीत धडक मारली आहे.
२५ ते २९ मार्चदरम्यान भोपाळच्या आरएमपी रेसिंग ट्रॅक वर आशियाई स्पर्धेची अंतिम फेरी रंगणार आहे. या प्रकल्पाचे मार्गदर्शक व फॅकल्टी प्रतिनिधी असलेले प्रोफेसर अव्वाब फक्की हे आहेत. सोलर कारच्या प्रकल्पात एकूण २२ विद्यार्थ्यांचा सहभाग आहे.
सध्या ग्लोबल वॉर्मिंगचा मोठा धोका निर्माण झाला आहे. गाड्यांमधून निघणाऱ्या धुरामुळे मोठ्या प्रमणात वायू प्रदूषण होते. सोलर कार ही सौरऊर्जेवर चार्ज होत असते. कारवर बसविलेले सोलर पॅनल हे सकाळी ९ ते १२ व दुपारी २ ते ४ या कालावधीत सौर किरणामार्फत चार्ज होईल. चार्ज झाल्यानंतर ही कार सुमारे १ ते २ तास चालणार आहे.
गाडीचा स्पीड २५ ते ३० कि.मी. असणार आहे. तीन माणसे या कारमध्ये बसू शकतात. पूर्णत: पर्यावरणपूरक कार असल्यामुळे कोणत्याही प्रकारचे प्रदूषण होणार नाही. ओझोनचा कमी होणारा थर, त्यामुळे उद्भवणाऱ्या समस्या लक्षात घेता या कारची निर्मिती करण्यात आली आहे.