विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती अनिश्चित
By Admin | Updated: March 4, 2016 01:52 IST2016-03-04T01:52:33+5:302016-03-04T01:52:33+5:30
रायगड जिल्ह्यातील तब्बल ६ हजार मागासवर्गीय विद्यार्थी सरकारी शैक्षणिक शिष्यवृत्तीस वंचित राहण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.

विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती अनिश्चित
जयंत धुळप , अलिबाग
रायगड जिल्ह्यातील तब्बल ६ हजार मागासवर्गीय विद्यार्थी सरकारी शैक्षणिक शिष्यवृत्तीस वंचित राहण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. यातील धक्कादायक बाब म्हणजे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या चवदार तळे सत्याग्रहामुळे डॉ.आंबेडकर आणि महाड असे एक अनन्यसाधारण ऐतिहासिक नाते असलेल्या महाडमधील डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयातीलच तब्बल ५२८ मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती अर्ज त्या महाविद्यालयातील सावळ््या गोंधळामुळे कोणत्याही आॅनलाइन प्रक्रियेविना महाविद्यालयातच पडून राहिले आहे. यामुळे या विद्यार्थ्यांना मोठ्या आर्थिक समस्येस सामोरे जावे लागणार आहे.
मागासवर्गीय विद्यार्थ्यांना भारत सरकार शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क योजनेअंतर्गत मिळणाऱ्या शिष्यवृत्तीचे फी मान्यतेचे काम रायगड सहायक समाज कल्याण आयुक्त कार्यालयाकडून गेल्या १ फेब्रुवारीलाच पूर्ण झाले.
जिल्ह्यातील तब्बल १२ हजार मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या चालू शैक्षणिक वर्षाच्या शिष्यवृत्तीवर अनिश्चिततेच्या सावटाचे वास्तव सांगणारे वृत्त गेल्या २५ फेब्रुवारीला ‘लोकमत’ने प्रसिद्ध केल्यावर दोन दिवसांत विविध महाविद्यालयांतील २ हजार ५०० अर्ज आॅनलाइन दाखल झाले. त्यानंतर जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांच्या प्राचार्यांच्या तातडीच्या बैठकीचे आयोजन रायगड सहायक समाज कल्याण आयुक्त प्रसाद खैरनार यांनी करुन २९ फेब्रुवारी या अखेरच्या आॅनलाइन मुदतीत विद्यार्थ्यांचे अर्ज दाखल करण्याचे सूचित केले होते. त्यावेळी महाडच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाचे प्राचार्य प्रतिनिधी उपस्थित होते, परंतु त्यांनी अखेरपर्यंत महाविद्यालयातील ५२८ मागासवर्गीय शिष्यवृत्तीपात्र विद्यार्थ्यांपैकी एकाही विद्यार्थ्याचा अर्ज आॅनलाइन पाठविला नसल्याचे रायगड सहायक समाज कल्याण आयुक्त प्रसाद खैरनार यांनी सांगितले.