विद्यार्थ्यांनी दिला स्वच्छतेचा संदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2016 00:27 IST2016-01-03T00:27:20+5:302016-01-03T00:27:20+5:30
न्यू इअर सेलीब्रेशन म्हटले की बेधुंद होऊ डीजेच्या तालावर थिरकणारी तरुणाई हे चित्र डोळ््यासमोर उभे राहते; मात्र नवी मुंबई शहरातील विविध महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन

विद्यार्थ्यांनी दिला स्वच्छतेचा संदेश
नवी मुंबई : न्यू इअर सेलीब्रेशन म्हटले की बेधुंद होऊ डीजेच्या तालावर थिरकणारी तरुणाई हे चित्र डोळ््यासमोर उभे राहते; मात्र नवी मुंबई शहरातील विविध महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन गुरुवारी वाशी उड्डाणपूल परिसरात ‘क्लीन-अप पार्टी’ स्वच्छता मोहीम राबविली. यामध्ये सहभागी ६० महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी दुपारी दोन ते पहाटे दोन वाजेपर्यंत वाशी उड्डाणपुलाचा चेहराच बदलून टाकला. या मोहिमेंतर्गत स्वयंसेवकांनी या मार्गावरील भिंतींवरही स्वच्छता, पर्यावरण संवर्धन तसेच वाहतुकीचे संदेश देणारे सूचना फलक रेखाटले.
स्वच्छ शहराचा ध्यास घेतलेल्या या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी १२ तासांमध्ये संपूर्ण परिसराची साफसफाई करून त्याचे रूपच पालटून टाकले. महामार्गावरून जाणारे प्रवासी कसलाही विचार न करता या मार्गावर खाऊचे पॅकेट, प्लास्टिकच्या पिशव्या, पाण्याच्या तसेच थंड पेयाच्या बाटल्या रस्त्यावर टाकतात, अशा नागरिकांना या स्वच्छता मोहिमेंतर्गत शहर स्वच्छ ठेवण्याचा संदेश देण्यात आला. नवी मुंबई नेटवर्किंग या सामाजिक संस्थेचा या मोहिमेमध्ये सहभाग होता.
या संस्थेच्या कार्यकर्त्यांच्या मार्गदर्शनाखाली तब्बल १२ तास ही मोहीम यशस्वीरीत्या राबविण्यात आली. नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त दिनेश वाघमारे यांची या ठिकाणी प्रमुख उपस्थिती होती.
स्मार्ट शहराकडे वाटचाल करणाऱ्या नवी मुंबई शहराला स्वच्छ शहराची ओळख कायम ठेवण्याकरिता प्रत्येक नागरिकाने आपला परिसर स्वच्छ ठेवणे गरजेचे असून, तरुणांनी या कामात सहभागी होणे गरजेचे आहे, अशी प्रतिक्रिया नवी मुंबई नेटवर्किंगचे अध्यक्ष संदीप शर्मा यांनी व्यक्त केली. नवी मुंबई महानगरपालिकेचे विभाग अधिकारी (सी विभाग) महेंद्रसिंग ठोके यांनीही या स्वच्छता मोहिमेमध्ये सहभाग घेतला होता. नीलेश कचरे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी हातात झाडू घेऊन संपूण परिसर स्वच्छ केला.