फादर अग्नेलच्या तरण तलावात बुडून विद्यार्थ्याचा मृत्यू
By कमलाकर कांबळे | Updated: April 13, 2024 20:44 IST2024-04-13T20:44:17+5:302024-04-13T20:44:52+5:30
फादर ॲग्नेल मल्टिपरपज हायस्कूलमध्ये इयत्ता अकरावीच्या विद्यार्थ्यांना स्वीमिंगचे प्रशिक्षण दिले जाते. त्यानुसार शनिवारी तीस ते चाळीस विद्यार्थ्यांचा स्वीमिंगचा तास होता.

फादर अग्नेलच्या तरण तलावात बुडून विद्यार्थ्याचा मृत्यू
नवी मुंबई : वाशी येथील फादर ॲग्नेल शाळेच्या तरण तलावात इयत्ता अकरावीत शिकणाऱ्या एका १७ वर्षीय विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू झाला आहे. ही दुर्घटना शनिवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडली. मयूर आदिनाथ डमाळे असे या मृत विद्यार्थ्याचे नाव असून, तो नेरूळ येथे राहावयास होता.
फादर ॲग्नेल मल्टिपरपज हायस्कूलमध्ये इयत्ता अकरावीच्या विद्यार्थ्यांना स्वीमिंगचे प्रशिक्षण दिले जाते. त्यानुसार शनिवारी तीस ते चाळीस विद्यार्थ्यांचा स्वीमिंगचा तास होता. विशेष म्हणजे यावेळी संबंधित प्रशिक्षकसुद्धा उपस्थित असतात. शनिवारी दुपारच्या वेळी इतर मुलांप्रमाणे मयूर यानेही स्वीमिंग पूलमध्ये उडी मारली. परंतु, तो बराच वेळ बाहेर आला नाही. त्यामुळे उपस्थित प्रशिक्षक, शिक्षक आणि इतर विद्यार्थ्यांनी शोधाशोध सुरू केली असता, तो तलावात मृतावस्थेत आढळून आला.
घटनेची माहिती कळताच वाशी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन अग्निशमन दलाच्या मदतीने मयूर याचा मृतदेह बाहेर काढला. त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून, रात्री उशिरापर्यंत पोलिस ठाण्यात नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती.