‘स्वच्छ भारत’साठी विद्यार्थ्यांची फौज
By Admin | Updated: December 8, 2015 00:57 IST2015-12-08T00:57:13+5:302015-12-08T00:57:13+5:30
रायगड जिल्ह्यातील स्वच्छ भारत मिशन पूर्ण करण्यासाठी जिल्हा परिषदेने जिल्ह्यातील ४० महाविद्यालयातील पाच हजार एनएसएस विद्यार्थ्यांची फौज या महत्त्वाकांक्षी मिशनमध्ये

‘स्वच्छ भारत’साठी विद्यार्थ्यांची फौज
आविष्कार देसाई, अलिबाग
रायगड जिल्ह्यातील स्वच्छ भारत मिशन पूर्ण करण्यासाठी जिल्हा परिषदेने जिल्ह्यातील ४० महाविद्यालयातील पाच हजार एनएसएस विद्यार्थ्यांची फौज या महत्त्वाकांक्षी मिशनमध्ये उतरली आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेचे हात आणखीन बळकट झाले आहेत. जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात ही यंग ब्रिगेड आता स्वच्छता मिशनबाबत प्रबोधन करणार आहे.
जिल्हा हागणदारीमुक्त करण्यासाठी जिल्हा प्रशासनातील विविध विभाग, त्याचप्रमाणे जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतील १५ पंचायत समिती, ८२४ ग्रामपंचायती प्रयत्न करीत आहेत. ६८ टक्के उद्दिष्ट गाठले असले, तरी २०१९ प्रयत्न हे मिशन पूर्ण करणे तसे जिल्हा परिषदेसाठी आव्हानच आहे. विविध बैठका, जनजागृती कार्यक्रम, कार्यशाळा, पोस्टर, बॅनर, मोठ-मोठे होर्डिंग्ज ठिकठिकाणी जनजागृती करण्यासाठी लावले जात आहेत. जास्तीत जास्त जनतेपर्यंत स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यासाठी जिल्हा परिषद विविध सेवाभावी संस्थांनाही या मिशनमध्ये समाविष्ट करुन घेत आहे.
महाविद्यालयातील एनएसएस कार्यक्रम अधिकारी आणि एनएसएस विद्यार्थ्यांनी या मिशनमध्ये स्वत:ला सहभागी करुन घ्यावे, असे आवाहन रायगड जिल्हा परिषदेचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी पुंडलिक साळुंखे यांनी केले होते. त्याला रायगड जिल्ह्यातील ४० महाविद्यालयातील पाच हजार एनएसएसच्या विद्यार्थ्यांनी साद दिली. त्यांच्यासाठी सोमवारी रायगड जिल्हा परिषदेच्या सभागृहात एका कार्यशाळचेही आयोजन केले होते. जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षाने ग्रामपंचायतींसाठी तयार केलेल्या पाणी गुणवत्ता मार्गदर्शिकेचे प्रकाशन जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी दिलीप पांढरपट्टे यांनी केले.