कंटेनर फोडणाऱ्या टोळीला अटक
By Admin | Updated: March 2, 2016 02:22 IST2016-03-02T02:22:30+5:302016-03-02T02:22:30+5:30
कंटेनर फोडून मालाची चोरी करणाऱ्या दोन टोळ्यांना गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली आहे. स्वत:ची बनावट ओळख तयार करून अथवा चालकाच्या मदतीने प्रवासादरम्यान

कंटेनर फोडणाऱ्या टोळीला अटक
नवी मुंबई : कंटेनर फोडून मालाची चोरी करणाऱ्या दोन टोळ्यांना गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली आहे. स्वत:ची बनावट ओळख तयार करून अथवा चालकाच्या मदतीने प्रवासादरम्यान ते कंटेनरमधून मालाची चोरी करायचे. त्यांच्याकडून अनेक गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता आहे.
पनवेल, तळोजा, उरण व जेएनपीटी परिसरात कंटेनर चोरीच्या अथवा त्यामधील माल चोरीच्या घटना सातत्याने घडत आहेत. या गुन्ह्याला आळा घालत सक्रिय टोळ्यांचा शोध घेण्यासाठी गुन्हे शाखा पोलिसांनी तपासकार्यावर अधिक भर दिला होता. यादरम्यान दोन टोळ्या पोलिसांच्या हाती लागल्या आहेत. एक टोळी चोरीचा मुद्देमाल घेवून तळोजा परिसरात येणार असल्याची माहिती मध्यवर्ती कक्षाचे वरिष्ठ निरीक्षक जगदीश कुलकर्णी यांना मिळाली होती. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक कोकणी, हवालदार संजय पवार, किरण राऊत, अनिल यादव, दिलीप भास्करे, मेघनाथ पाटील यांच्या पथकाने खुटारी गावालगत सापळा रचला होता. वाहनांची झाडाझडती सुरू असताना सुती धाग्याचे बंडल असलेला डम्पर (एमएच ४६ एफ २७००) पोलिसांना संशयित आढळून आला. चौकशीत डम्परमधील माल चोरीचा असल्याचे समोर आले.
यानुसार डम्परमधील दिलीप बिकटे, अमनसिंग सिंग, रियाज शेख यांना अटक करण्यात आली. हा माल नवकार कंपनीतून बांगलादेश येथे निर्यात करण्यासाठी कंटेनरमधून जेएनपीटीला पाठवण्यात आला होता. परंतु प्रवासात कंटेनर फोडून सुती धाग्याचे बंडल चोरीला गेले होते. अमनसिंग हा बनावट कागदपत्राच्या आधारे स्वत:ची खोटी ओळख तयार करून कंपनीत नोकरी मिळवायचा. आणि संधी साधून जबाबदारी सोपवलेला कंटेनर चोरी करायचा.
याचदरम्यान १९ लाख ५१ हजार रुपये किमतीचा फेरोक्रोम हाय कार्बन स्टीलसाठी लागणारा कच्चा माल चोरीला गेल्याची तक्रार पोलिसांकडे आली होती. या गुन्ह्यातील कंटेनर चालक समीर खान ऊर्फ मोहम्मद हा कारवाईच्या भीतीने पोलिसांना शरण आला होता. तसेच चौकशीत त्याने पोलिसांना मुख्य आरोपींची माहिती दिलेली. यानुसार रमजान अन्सार (२५) व आलम अन्सारी (२८) या दोघांना भिवंडी येथून अटक केली असून त्यांच्या फरार साथीदारांचा पोलीस शोध घेत आहेत. त्यांनी समीर खान याचे बनावट ड्रायव्हिंग लायसन्स बनवून त्याला एका कंपनीत कामाला लावले होते. यानुसार समीर मालाचा कंटेनर घेवून जात असताना कंटेनर चोरी करून दिल्लीला नेला. तसेच समीर याला धमकावून सोबत नेले होते. परंतु त्यांच्या तावडीतून सुटताच समीरने नवी मुंबई गुन्हे शाखेशी संपर्क साधून संपूर्ण प्रकाराची माहिती दिली. (प्रतिनिधी)