एपीएमसीमधील सर्व इमारतींचे स्ट्रक्चरल आॅडिट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2017 03:01 IST2017-08-01T03:01:38+5:302017-08-01T03:01:38+5:30
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीने मार्केट आवारामधील सर्व इमारतींचे स्ट्रक्चरल आॅडिट यापूर्वीच केले आहे. याशिवाय संपूर्ण फळ बाजारातील इमारतींचे आॅडिट करण्यासाठी एजन्सीची नियुक्ती केली आहे.

एपीएमसीमधील सर्व इमारतींचे स्ट्रक्चरल आॅडिट
नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीने मार्केट आवारामधील सर्व इमारतींचे स्ट्रक्चरल आॅडिट यापूर्वीच केले आहे. याशिवाय संपूर्ण फळ बाजारातील इमारतींचे आॅडिट करण्यासाठी एजन्सीची नियुक्ती केली आहे.
घाटकोपर येथे झालेल्या इमारत दुर्घटनेनंतर मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील सर्व इमारतींचे स्ट्रक्चरल आॅडिट करण्याची मागणी भाजपाचे घणसोलीतील कार्यकर्ते कृष्णा पाटील यांनी केली होती. या पार्श्वभूमीवर बाजार समितीने याविषयी आतापर्यंत केलेल्या कार्यवाहीची माहिती दिली आहे.
बाजार समितीच्या कांदा - बटाटा मार्केटमधील ७ इमारती २०१३ मध्ये महापालिकेने धोकादायक घोषित केल्या आहेत. इमारतींच्या पुनर्बांधणीसाठी प्रशासनाकडून कार्यवाही सुरू आहे.
पुनर्बांधणीचा विषय उच्च न्यायालयामध्ये प्रलंबित असल्याने प्रत्यक्ष पुनर्बांधणी करण्यात येत नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. बाजार समितीने २०१३ मध्ये सर्व इमारतींचे स्ट्रक्चरल आॅडिट करून त्याची माहिती महापालिका प्रशासनाला दिली आहे.
फळ मार्केटमधील मध्यवर्ती सुविधागृह, निर्यातदार इमारत व मसाला मार्केटमधील मध्यवर्ती सुविधागृहाचे स्ट्रक्चरल आॅडिट करण्यासाठी निविदा मागविण्यात आलेल्या होत्या. त्यापैकी कमी निविदा असलेल्या ग्लोबल इंजिनियरिंंग सर्व्हिसेस या कंपनीला स्ट्रक्चरल आॅडिट करण्यासाठीचे कार्यादेश २८ जुलैला दिले असल्याची माहिती अधीक्षक अभियंता व्ही. बी. बिरादार यांनी दिली आहे.