ग्रामस्थांचा स्थलांतरास ठाम विरोध
By Admin | Updated: May 23, 2016 03:09 IST2016-05-23T03:09:28+5:302016-05-23T03:09:28+5:30
भूगर्भ शास्त्रज्ज्ञांच्या अहवालानुसार महाड तालुक्यातील ३४ गावांना दरडी कोसळण्याचा धोका संभवत असल्याचे सांगण्यात आले आहे

ग्रामस्थांचा स्थलांतरास ठाम विरोध
महाड : भूगर्भ शास्त्रज्ज्ञांच्या अहवालानुसार महाड तालुक्यातील ३४ गावांना दरडी कोसळण्याचा धोका संभवत असल्याचे सांगण्यात आले आहे. या अहवालामुळे महसूल विभाग खडबडून जागा झाला असून ३४ गावातील दरडीचा धोका टाळण्यासाठी या दरडप्रवण गावातील दोन हजार ५० कुटुंबातील नऊ हजार ग्रामस्थांना स्थलांतर करण्याच्या सूचना महसूल विभागामार्फत देण्यात आलेल्या आहेत. मात्र या गावातील बहुतांश कुटुंबांनी स्थलांतर करण्यास ठाम विरोध दर्शवला आहे. आधी पुनर्वसन करा मगच त्या ठिकाणी आमचे स्थलांतर करु अशी भूमिका या दरडप्रवण गावातील ग्रामस्थांनी घेतल्याने महसूल विभागापुढे मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
महसूल विभागाला आपली खरोखरच काळजी वाटते मग केवळ पावसाळ्यापूर्वीच हे स्थलांतराचे सोपस्कार का केले जातात, असा सवालही हे ग्रामस्थ व्यक्त करताना दिसून येत आहेत. मुळात महाड तालुक्यातील गावे डोंगरालगत आहे. २००५ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे जुई, कोंडीवते, दासगाव, रोहन या गावावर दरडी कोसळून शेकडो जणांचे बळी गेले तर असंख्य कुटुंबे बेघर झाली. या दरडग्रस्त बेघर कुटुंबांचे दासगाव वगळता सर्व ठिकाणचे पुनर्वसन प्राईड इंडिया, लालबागचा राजा ट्रस्ट, जनकल्याण ट्रस्ट या सेवाभावी संस्थांमार्फत करण्यातही आले. या पार्श्वभूमीवर यंदा नेहमीपेक्षा अधिक पर्जन्यवृष्टी होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने दिल्यामुळे महसूल विभागामार्फत उपाययोजना केली जात आहे. त्या दृष्टीने दरडीचा धोका टाळण्यासाठी दरडप्रवण ३४ गावातील ग्रामस्थांनी अन्यत्र स्थलांतर करावे जर ही कुटुंबे स्थलांतरित झाली नाहीत तर त्या कुटुंबाचे जबरदस्तीने स्थलांतर करण्याचा इशारा महसूल विभागातर्फे दिला आहे
२००५ पासून आम्हाला स्थलांतर करण्याच्या सूचना शासन देते, मात्र गेली ११ वर्षे शासनाने याबाबत कुठलीही उपाययोजना केली नसल्याचे हे ग्रामस्थ संतप्त होवून सांगत आहेत. (वार्ताहर)